झेडपीच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात कोट्यवधींचं घबाड! 5.16 कोटींची बेहिशेबी संपत्ती उघड, 2.5 किलो सोनं अन् 11.6 किलो चांदी…

झेडपीच्या लाचखोर अधिकाऱ्याच्या घरात कोट्यवधींचं घबाड! 5.16 कोटींची बेहिशेबी संपत्ती उघड, 2.5 किलो सोनं अन् 11.6 किलो चांदी…
Crime News : जळगाव – जिल्हा परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (मोठी कारवाई केली आहे. बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सतीश मन्सुलाल शिसोदे यांना 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर एसीबीने केलेल्या घरझडती आणि बँक लॉकरच्या तपासात तब्बल 5 कोटी 16 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिसोदे एका प्रकरणात लाच घेत असताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मालमत्तेची झाडाझडती सुरू केली. आदर्श नगर भागात असलेल्या त्यांच्या दोन घरांची किंमत अनुक्रमे 45 लाख आणि 65 लाख रुपये असल्याचे निष्पन्न झाले आहे. या छाप्यादरम्यान घरातून 7 लाख 97 हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम आणि 24 लाखांच्या इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. एकूणच त्यांच्या घरामध्ये 1 कोटी 41 लाख रुपयांची बेहिशबी मालमत्ता आढळली.
या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठे घबाड त्यांच्या बँक लॉकरमध्ये सापडले. लॉकरची झडती घेतली असता सुमारे 3 कोटी 74 लाख रुपयांचे सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने हाती लागले. यामध्ये चक्क अडीच किलोपेक्षा जास्त वजनाची सोन्याची बिस्किटं, चेन, बांगड्या आणि 11 किलोहून अधिक चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय प्लॅटिनमचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आता शिसोदे यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा ही संपत्ती किती पटीने जास्त आहे, याची कसून चौकशी सुरू आहे. तसेच त्यांच्या बँक खात्यांचे व्यवहार आणि कंत्राटांमधील आर्थिक उलाढालींचीही एसीबीकडून कसून पडताळणी केली जात आहे.



