Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयराजकीय

“पाकिस्तान सैन्यानेच दहशतवादी तयार केले, पैसाही पुरवला”; आंतरराष्ट्रीय कोर्टात मोठी साक्ष,स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडली आणि हजारो कुटुंबे बेघर

Spread the love

Pakistan News: आंतरराष्ट्रीय न्यायालयातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. पाकिस्तानच्या सैन्यानेच दहशतवाद्यांची फळी तयार केली. दहशतवाद्यांना पैसा पुरवला, अनेक कारवाया घडवून आणल्या, अशी महत्त्वाची साक्ष देण्यात आली आहे.

पश्तून तहफुज मुव्हमेंट (PTM) प्रमुख मंजूर पश्तीन यांनी पाकिस्तानच्या सैन्यावर आणि गुप्तचर यंत्रणांवर मोठे आरोप केले आहेत.

 

पश्तून भागांमध्ये दहशतवादी गट तयार करणे, त्यांना निधी पुरवणे आणि प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही पश्तीन यांनी केला आहे. या आरोपांमुळे पाकिस्तानचे लष्कर पुन्हा एकदा जगासमोर उघडे पडले आहे. स्थानिक लोकांना जबरदस्तीने विस्थापित करण्यासाठी, खनिज संपन्न प्रदेश ताब्यात घेण्यासाठी दहशतवादी कारवायांचा वापर केला जात आहे, असा दावाही करण्यात आला आहे.

 

गेल्या २३ वर्षांपासून लाखो पश्तूनांना संघर्षाचा सामना करावा लागला

आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) व्हर्च्युअल पद्धतीने बोलताना पश्तीन म्हणाले की, गेल्या २३ वर्षांपासून लाखो पश्तूनांना संघर्षाचा सामना करावा लागला आहे. त्यांचा समुदाय सातत्याने होणाऱ्या रक्तपाताने उद्ध्वस्त झाला आहेत. पाकिस्तानचे सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा खैबर पख्तुनख्वामध्ये सशस्त्र गट तयार करतात. दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या लष्करी कारवायांमध्ये हजारो पश्तून नागरिक ठार झाले, हजारो बेपत्ता झाले, लाखो विस्थापित झाले. परंतु खैबर पख्तुनख्वामध्ये शांतता प्रस्थापित झालेली नाही. ही सगळी परिस्थिती सांगत असतानाच, पाकिस्ताचे आसिफ दुर्रानी आणि राजदूत सभात्याग करून बाहेर पडले.

 

स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडली आणि हजारो कुटुंबे बेघर

पश्तीन यांनी दावा केला की, गेल्या २२ वर्षांत पाकिस्तानी सैन्याने ७६,००० पश्तून नागरिक मारले आहेत, तर अंदाजे ६,७०० जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांनी असा आरोप केला की, या संघर्षादरम्यान अडीच लाख घरे आणि ३५,००० दुकाने उद्ध्वस्त झाली, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडली आणि हजारो कुटुंबे बेघर किंवा उपजीविकेविना झाली. पश्तीन यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने २००४ पासून डझनभर मोठ्या मोहिमा आणि हजारो लहान लक्ष्यित हल्ले केले आहेत, परंतु त्यांना त्या प्रदेशात सुरक्षा प्रस्थापित करण्यात अपयश आले आहे.

 

दरम्यान, पाकिस्तान लष्कराने त्या भागातील नैसर्गिक संसाधनांची नासधूस केली. कुर्रम, ओरकझाई, बाजोर, दक्षिण वझिरिस्तान, बुनेर आणि स्वात येथील लष्करी कारवाईमुळे मोठ्या संख्येने लोक विस्थापित झाले आहेत. बरेच जण परतले, तेव्हा त्यांना त्यांची घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झालेली आढळली. पश्तीन यांनी पाकिस्तानी लष्करावर या भागात भूसुरुंग पेरल्याचा आरोपही केला असून, त्यामुळे शेकडो लोक ठार किंवा जखमी झाल्याचे म्हटले आहे.