Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्या

सौदी अरेबियाची विमानसेवा २४ ऑक्टोबरपर्यंत रद्द

मुंबई : मध्य पूर्व भागातील वाढता तणाव आणि रियाध विमानतळावरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांनी सौदी अरेबियासाठीच्या विमानसेवा रद्द करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे.

इंडिगो आणि अकासा एअर विमान कंपनीने रियाध, जेद्दाह, दम्माम आणि मदिना या शहरांसाठीची विमानसेवा २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत रद्द केली आहे. तर एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस रियाध, दम्माम आणि जेद्दाह येथील विमानसेवा २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत स्थगित केली आहे.

गेल्या आठवड्यात हुथी बंडखोरांनी रियाध विमानतळावर हल्ले केल्यानंतर विमान कंपन्यांनी आपली सेवा तात्पुरती स्थगित केली होती. इराण – समर्थित हुथी गट आणि सौदी अरेबिया यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून, यात सशस्त्र ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले जात आहेत. इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, एअर इंडिया आणि आकासा एअर यांनी मंगळवारी सौदी अरेबियातील शहरांशी जोडणारी आपली विमानसेवा १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द केल्याची घोषणा केली होती. दरम्यान, परिस्थिती अधिक बिकट होत असल्याने विमान कंपन्यांनी सुरक्षेसाठी विमान सेवा रद्द करण्याचा कालावधी वाढविला आहे. आकासा एअरने सांगितले की, मध्यपूर्वेतील सध्याची सुरक्षा स्थिती पाहता रियाधला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या सर्व विमानसेवा २४ ऑक्टोबरपर्यंत, तर जेद्दाहला जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमानसेवा २१ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इंडिगोने,’सौदी अरेबियातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रियाध, जेद्दाह, दम्मम आणि मदिना येथे जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या विमानसेवा २४ ऑक्टोबरपर्यंत रद्द राहतील. ज्या प्रवाशांवर याचा परिणाम झाला आहे, त्यांना बुकिंगच्या वेळी दिलेल्या संपर्क तपशीलांद्वारे वेळेवर सूचित केले जात असल्याचे म्हटले आहे.

सात दिवसांत परतावा

रद्द झालेल्या विमानसेवांचा फटका बसलेले प्रवासी पूर्ण परताव्याचा पर्याय निवडू शकतात. सात दिवसांच्या आत प्रवाशांना परतावा मिळू शकतो. तसेच कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रवासी प्रवासाच्या तारखा पुन्हा निश्चित करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *