Navgan News



Add Space

नवगण विश्लेषणराष्ट्रीय

धक्कादायक !15 हजार कमवणाऱ्याच्या घरावर रेड, नावावर होती 350 कोटींची कंपनी, घडल काय ?

Spread the love

कर्नाटकातील बेल्लारी येथून एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. महिन्याला केवळ 15 हजार रुपये कमावणाऱ्या एका तरुणाला एके दिवशी समजले की, त्याच्या नावावर तब्बल 350 कोटी रुपयांचा व्यवसाय सुरू आहे.

त्याच्या नावाने जीएसटीची बिले तयार केली जात होती आणि त्याला याची साधी कल्पनाही नव्हती. जेव्हा त्याने ही बिले पाहिली, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर घडलेला प्रकार आणखी आश्चर्यकारक होता.

बेल्लारी येथे राहणाऱ्या रोशन जमील एका कार शोरूममध्ये सर्व्हिस अॅडव्हायझर म्हणून काम करतो. तर त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात. मात्र गेल्या गुरुवारी अचानक केंद्रीय जीएसटी विभागाचे अधिकारी त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी रोशन कामावर गेला होता आणि घरी त्याची आई होती. अधिकाऱ्यांनी रोशनबद्दल विचारणा केली असता, तो घरी नसल्याचे आईने सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती ऐकून संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोशनच्या नावावर जीएसटी नोंदणी करण्यात आली आहे आणि आता ती बंद केली जात आहे. आयुष्यात कधीही कोणताही व्यवसाय न केलेल्या तरुणाच्या नावावर जीएसटी नोंदणी झालीच कशी, असा प्रश्न कुटुंबीयांना पडला.

ऑडिटरने उघड केले 350 कोटींच्या व्यवहारांचे गुपित

जीएसटी विभागाचे अधिकारी निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने एका ऑडिटरशी संपर्क साधला. ऑडिटरने रोशनची माहिती तपासली असता त्यालाही धक्का बसला. रोशनच्या नावावर उघडण्यात आलेल्या बनावट जीएसटी खात्याच्या माध्यमातून तब्बल 350 कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आल्याचे ऑडिटरने सांगितले.

रोशनच्या म्हणण्यानुसार या जीएसटी नोंदणीबद्दल किंवा कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांबद्दल त्याला अथवा त्याच्या कुटुंबीयांना कधीही मोबाइलवर मेसेज, ईमेल किंवा कोणतीही सूचना मिळाली नव्हती. त्याचे नाव आणि ओळख वापरून दुसरीच कोणीतरी व्यक्ती कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करत होती.

पोलिसांकडे तक्रार दाखल
हा प्रकार उघड झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि एफआयआर दाखल केला. या प्रकरणात कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल करायचा, याबाबत पोलीस कायदेशीर सल्लागारांचे मत घेत आहेत. पोलिसांनी जीएसटी विभागालाही पत्र लिहून संपूर्ण माहिती मागवली आहे. ही नोंदणी नेमकी कोणी केली आणि 350 कोटी रुपये कोणाच्या खात्यात जमा झाले, याची माहिती पोलिसांनी मागितली आहे.

कोणत्याही पडताळणीशिवाय GST नोंदणी कशी झाली?

या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर उपस्थित होत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कोणत्याही व्यवसायासाठी जीएसटी क्रमांक जारी करण्यापूर्वी संबंधित पत्ता आणि कार्यालयाची प्रत्यक्ष पडताळणी करणे आवश्यक असते. मग रोशनच्या प्रकरणात कोणतीही तपासणी न करता एवढी मोठी नोंदणी कशी झाली?

रोशनची ओळखपत्रे चोरून हा संपूर्ण बनावट व्यवहारांचा जाळे विणणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस आता तपास करत आहेत.