MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मधील घोटाळ्यांच्या बातम्यांनी अनेकांना वीट आणला असेल. त्याबातम्यांपासून थोडी फारकत घेत मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका महत्त्वाच्या वाक्याचा विचार करत स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला लागावे असेच म्हणावे लागेल, कारण आतापर्यंतचे विक्रम मोडणारी मोठ्या प्रमाणातील एमपीएससी भरती करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
एमपीएससीतील पेपर फुटी असो, घोटाळे असो वा कमी प्रमाणात होणारी पदभरती, या सर्वांमुळे मागील काही दिवसांपासून स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही हा प्रश्न उचलून धरला. आता मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससीबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अनेक महत्त्वाचे विधान केले आहे.
विक्रमी संख्येने पदे पहायला मिळणार
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एमपीएससीमध्ये सध्या तुलनेने कमी पदे असतात. ग्रुप सीमध्येही कमी पदे असतात. यंदा पाच विभागांचे सादरीकरण झाले. किती पदे आहेत, किती पदे रिक्त आहेत आणि किती पदांची मागणी करण्यात आली आहे, याचा नियमित आढावा घेतला जात आहे.
ते पुढे म्हणाले की, या सर्व गोष्टींचा विचार करता पुढील भरतीमध्ये विक्रमी संख्येने पदे पहायला मिळतील. आतापर्यंतचे विक्रम मोडणारी मोठ्या प्रमाणातील एमपीएससी भरती केली जाईल. तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदे भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत असून एमपीएससीच्या संदर्भात समिती उत्तम काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या मागणीला जोर
तसेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची मागणी पुढे येत आहे. दळवी समितीने त्यावेळी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शिफारस केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा या मागणीने जोर धरला आहे. म्हणून समितीने जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न स्वीकारण्याची मागणी करते, तर शासन त्याबाबत सकारात्मक असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
आमचा उद्देश विद्यार्थी हिताचा
एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सध्या एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा मागितला जात आहे. मुळात ज्या घोटाळ्याबाबत चर्चा केली जात आहे, तो त्यांच्या पदावर रुजू होण्यापूर्वीचा आहे. एमपीएससी अध्यक्षांची नियुक्ती ही राज्यपालांनी केली आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन न करता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे योग्य नसून आमचा उद्देश विद्यार्थ्यांच्या हिताचा असल्याचे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.



