
कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या १०-१५ वर्षांपासून सुरू असलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला शहरातील काही कार्यकर्त्यांच्या हेकेखोरीमुळे खो बसला. ज्या पंचगंगा प्रदूषणावर शेकडोंच्यावर बैठका होतात, तीच कोल्हापूरची जीवनदायिनी प्रदूषित करण्यासाठी हातभार लावला गेला. प्रशासनाला विरोध करून बॅरिकेड्स हटवणारे हे मोजके कार्यकर्ते होते पण त्यांच्यामुळे हजारो गणेशमूर्ती पंचगंगेत विसर्जित झाल्या. शहरात, उपनगरांसह जिल्ह्यात साडेतीन लाखांवर मूर्तींचे कुंडात विसर्जन झाले असताना पंचगंगेलगतच्या भागातील लोकांनी उलटा फेरा केला. कोल्हापुरात गेल्या १०-१५ वर्षांपासून घरगुती गणेशमूर्तींचे कुंडामध्ये पर्यावरणपूरक विसर्जन केले जाते. एकही मूर्ती पंचगंगा, रंकाळा, कळंबा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा या जलाशयांमध्ये विसर्जित होत नाही. हा आदर्श पर्यावरणपूरक गणेशोत्सव अभिमानाने मिरवला जात असताना गेल्या तीन वर्षांपासून काही कार्यकर्त्यांच्या हेकेखोरपणामुळे या चळवळीला खो बसत आहे. सकाळी ११ वाजता कार्यकर्ते गणेशमूर्ती घेऊन येतात. नदीतच विसर्जन करायचे आहे म्हणत पोलिसांशी वाद घालतात. बॅरिकेड्स सोडतात आणि नदी पात्रात गणेशमूर्ती विसर्जित करतात. अख्ख्या कोल्हापूर शहरात, उपनगरात किंवा जिल्ह्यात कुठेही जलाशयात गणेशमूर्ती विसर्जित केली जात नाही. फक्त पंचगंगेवर असा प्रकार होतो..
अनेक नागरिक पंचगंगेऐवजी कुंडात मूर्ती विसर्जित करत होते. काही कार्यकर्ते तेथील विसर्जित मूर्ती नेऊन नदीत विसर्जित करत होते. जाणीवपूर्वक प्रशासनाला विरोधच करायचा या हेतूने असे प्रकार केले.
नदीतच विसर्जनाची सक्ती.. कार्यकर्ते दुपारपासून पंचगंगा घाटावर उभारून होते. भाविक मूर्ती घेऊन आले की त्यांना मूर्ती पंचगंगेत विसर्जित करायला जा असे सांगायचे. जे भाविक कुंडात विसर्जनाला जात होते त्यांना नदीतच मूर्ती विसर्जित करायला भाग पाडले जात होते.
महापालिका, पोलीस बघ्याच्या भूमिकेत हा प्रकार सुरू असताना पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. यांना काही बोलले की भावना दुखावतात, संस्कृतीचा अपमान होतो आजच्या दिवशी काही बोलायचं नाही अशा शब्दांत त्यांनी आपली अडचण सांगितली.



