मोबाईल रिचार्जसाठी नवा नियम, कॉलिंग अन् SMSचे प्लॅन स्वस्त आणण्याचे आदेश; Rechargeचा खर्च थेट अर्ध्यावर, टेलिकॉम कंपन्यांना TRAIचा दणका

दिल्ली: डेटा वापरत नसलेल्या मोबाइल ग्राहकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच TRAIने ग्राहकांसाठी नवा नियम जारी केला आहे. या नियमामुळे आता मोबाइल ग्राहकांना डेटा नसलेले, केवळ कॉलिंग आणि SMSची सुविधा देणारे रिचार्ज प्लॅन उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे डेटा वापरत नसतानाही डेटा असलेल्या महागड्या प्लॅनसाठी पैसे मोजण्याची ग्राहकांची गरज कमी होणार आहे.
TRAIने ‘टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन (तेरावा दुरुस्ती) रेग्युलेशन, 2026’ जारी केले आहे. या नव्या नियमांनुसार सर्व टेलिकॉम कंपन्यांना ‘व्हॉइस आणि SMS ओन्ली’ प्रकारचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये मोबाइल डेटा दिला जाणार नाही. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार केवळ कॉलिंग आणि SMSसाठी रिचार्ज करण्याचा पर्याय मिळणार आहे.
TRAIने ‘टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन (तेरावा दुरुस्ती) रेग्युलेशन, 2026’ जारी केले आहे. या नव्या नियमांनुसार सर्व टेलिकॉम कंपन्यांना ‘व्हॉइस आणि SMS ओन्ली’ प्रकारचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्लॅनमध्ये मोबाइल डेटा दिला जाणार नाही. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार केवळ कॉलिंग आणि SMSसाठी रिचार्ज करण्याचा पर्याय मिळणार आहे.
TRAIच्या म्हणण्यांनुसार आतापर्यंत बाजारात केवळ कॉलिंग आणि SMSची सुविधा देणारे रिचार्ज प्लॅन तुलनेने कमी होते. विशेषतः कमी कालावधीच्या रिचार्जमध्ये अशा पर्यायांची कमतरता होती. त्यामुळे डेटा वापरत नसलेल्या ग्राहकांनाही डेटा असलेले प्लॅन घ्यावे लागत होते. ग्राहकांच्या या अडचणीचा विचार करून TRAIने नियमांमध्ये बदल केला आहे.
नव्या नियमांनुसार ज्या ग्राहकांना 30 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचा रिचार्ज हवा आहे त्यांच्यासाठी प्रत्येक टेलिकॉम कंपनीला किमान एक ‘व्हॉइस आणि SMS ओन्ली’ प्लॅन उपलब्ध करून द्यावा लागेल. म्हणजेच कमी वैधतेच्या रिचार्जमध्येही ग्राहकांना डेटा नसलेला पर्याय मिळेल.
याशिवाय ग्राहकांसाठी आणखी एक महत्त्वाचा पर्याय देण्यात आला आहे. कंपन्यांना असा रिचार्ज पर्याय उपलब्ध करून द्यावा लागेल, ज्यामध्ये ग्राहक दर महिन्याला एका निश्चित तारखेला आपला रिचार्ज रिन्यू करू शकतील. त्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या तारखेला रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही. ठरलेल्या तारखेला मासिक रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना मिळू शकते.
फक्त 30 दिवसांपर्यंतच्या रिचार्जपुरतेच हे नियम मर्यादित नाहीत. 30 दिवसांपेक्षा जास्त वैधता असलेला किमान एक ‘व्हॉइस आणि SMS ओन्ली’ प्लॅनही प्रत्येक टेलिकॉम कंपनीला उपलब्ध करून द्यावा लागणार आहे. त्यामुळे ज्यांना दीर्घ वैधतेचा रिचार्ज हवा आहे. पण मोबाइल डेटाची गरज नाही, अशा ग्राहकांनाही आता डेटा नसलेला पर्याय मिळणार आहे.
TRAIने कंपन्यांना या प्लॅनच्या किमतीबाबतही ग्राहकांच्या हिताचा विचार करण्यास सांगितले आहे. व्हॉइस आणि SMSपुरते मर्यादित असलेले प्लॅन डेटा असलेल्या प्लॅनच्या तुलनेत स्वस्त असावेत यासाठी त्यांच्या किमतींमध्ये योग्य कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वापरानुसार रिचार्ज निवडण्याची संधी मिळणार आहे.
या निर्णयाचा फायदा विशेषतः अशा ग्राहकांना होऊ शकतो, जे मोबाइल इंटरनेटचा वापर करत नाहीत किंवा अतिशय कमी प्रमाणात करतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांना किंवा केवळ कॉल आणि SMSसाठी मोबाइल वापरणाऱ्या ग्राहकांना आता त्यांच्या गरजेनुसार प्लॅन निवडता येईल. त्याचबरोबर मर्यादित बजेट असलेल्या ग्राहकांनाही अनावश्यक डेटा सुविधेसाठी अतिरिक्त पैसे खर्च करण्याची गरज कमी होऊ शकते.
TRAIने या निर्णयापूर्वी प्रस्तावित नियमांवर ग्राहक आणि संबंधित घटकांकडून प्रतिक्रिया मागवल्या होत्या. या मसुद्यावर एकूण 1,132 प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. या प्रतिक्रिया आणि त्यातून समोर आलेल्या मुद्द्यांचा विचार केल्यानंतर TRAIने अंतिम नियम जारी केला आहे.



