Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

करंजा बंदराचा लवकरच विकास; विविध कामांसाठी १३६.७६ कोटींचा निधी मंजूर

करंजा बंदराच्या विकासासाठी शासनाने १३६.७६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून गाळाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे. करंजा बंदरातील बोटींच्या प्रवेश मार्गावरील गाळ काढणे, अतिरिक्त रुंदीकरण, ३७० मीटर अतिरिक्त लांबीची धक्का भिंत अशा विविध विकासकामांसाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने १३६.७६ कोटींचा निधी मंजूर केला आहे.

येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या कामाला सुरुवात होणार आहे. मच्छीमारांना भेडसाविणारी बंदरातील महत्त्वाची गाळाची व अतिरिक्त धक्काभिंतींची समस्या दूर होणार असल्याने रायगडच्या हजारो मच्छीमारांना याचा लाभ होणार आहे.

करंजा मच्छीमार बंदरातून मासेमारी हंगामात ५५० कोटी किमतीच्या मासळीची निर्यात होते. मात्र करंजा बंदरात मागील दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर साचलेल्या गाळामुळे मच्छीमार अडचणीत आले आहेत. गाळामुळे हजारो मच्छीमारांना ओहोटीच्या वेळी बंदरात मासळी उतरवून पुन्हा जाण्यासाठी बंदरातच चार ते सहा तासांपर्यंत वाट पाहावी लागते. यामुळे बंदरात आणि बंदराबाहेर शेकडो बोटी गाळात अडकून पडतात. त्यामुळे बंदरातील गाळ काढण्याची मागणी करंजा मच्छीमार संस्था व मच्छीमारांकडून केली जात होती. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.

मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने करंजा मच्छीमार बंदराच्या विविध प्रकारच्या २१ कामांसाठी खर्चाचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे यांनी दिली. यामध्ये प्रामुख्याने ३७० मीटर लांबीची अतिरिक्त धक्काभिंत उभारण्याच्या कामासाठी २६ कोटी ७७ लाख ८८ हजार ६३२ कोटी तर प्रवेश मार्गावरील गाळ व रुंदीकरणाच्या कामासाठी २१ कोटी २५ लाख ४७ हजार ८३ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. बंदरातील काँक्रीटीकरण, लिलाव केंद्र -४, प्रशासकीय भवन, संपर्कासाठी रेडिओ भवन, उपहारगृह, सुरक्षा कक्ष, कंपाऊंड वॉल,सेव्हरेज ट्रिटमेंट प्लाण्ट, बर्फ फॅक्टरी ,१०० टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, पाणीपुरवठा, ड्रेनेज,सेव्हरेज सिस्टीम, डिझेल पंप आदी विविध प्रकारच्या कामांसाठी ८८ कोटी ७५ लाख ४७ हजार ७३६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *