मोदींच्या बालमित्राला जमिनीची प्रतीक्षाच, भाजप आमदार मेहतांनी ताबा सोडला, पारेखांनी नाही; शिवसेनेच्या तक्रारीनंतर घडामोडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शालेय जीवनातील मित्र असगर अली वोरा हे आपल्या जमिनीचा ताबा परत मिळवण्यासाठी अजूनही संघर्ष करत आहेत. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीने ही मालमत्ता सोडल्याचे जाहीर केले असले, तरी एका दुसऱ्या विकासकाने या जमिनीचा ताबा आपल्याकडेच कायम ठेवल्याचा दावा केला जात आहे.
२७ वर्षांपूर्वी भाईंदरला घेतलेली जमीन
८१ वर्षीय वोरा यांनी १९८९ मध्ये भाईंदर (पूर्व) येथील नवघर भागात सुमारे २८१० चौरस मीटर जमीन खरेदी केली होती. २०११ मध्ये ‘स्वयं बिल्डर्स’ आणि नरेंद्र मेहता यांच्या ‘सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन्स’ने या मालमत्तेचा ताबा घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मीरा रोडचे रहिवासी असलेल्या असगर अली वोरा यांनी गुजरातच्या वडनगरमधील बी. एन. स्कूलमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सोबत शिक्षण घेतले होते. अनेक वर्षांचा लढा सफल होत नसल्याने अखेर वोरा यांनी आपली ओळख वापरली होती.
मोदींच्या भेटीत सकारात्मक प्रतिसाद
या प्रकरणी जवळपास १५ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर, अखेर
वोरा-मोदी भेटीनंतर सरकारी यंत्रणांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वोरा, मेहता, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा आणि नगररचनाकार पुरुषोत्तम शिंदे उपस्थित राहिले होते.
नगररचना विभागाला पत्र
बैठकीदरम्यान, नरेंद्र मेहता यांनी नगररचना विभागाला एक पत्र सादर केले होते. त्यात त्यांनी नमूद केले की, ते वादग्रस्त जमिनीचा ताबा सोडत आहेत आणि मिळालेली बांधकामाची परवानगीही परत करत आहेत. मेहता यांनी पत्रात म्हटले होते की, ही जमीन २०१९ मध्ये मर्विन फर्नांडिस यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती.



