Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेत मोठ्या बदलाचे संकेत, विद्यार्थ्यांच्या वस्तुनिष्ठ परीक्षेच्या मागणीनंतर आता विशेष समिती..

नागपूर : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.

या समितीच्या बैठका राज्यभर विविध विभागीय केंद्रात सुरू आहेत. समिती समोर राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ (बहुपर्यायी) पद्धतीने घ्यावी अशा सूचना व्यापक स्वरूपात येत आहेत. यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती लोकसत्ताच्या हाती लागली आहे. यावरून भविष्यात मुख्य परीक्षेमध्ये कुठला बदल होणार याची संकेत विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

आयोगाने काय निर्णय घेतला होता

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२२ मध्ये मोठा निर्णय घेतला होता. तो म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक म्हणजेच लेखी करण्याचा महत्त्वाचा निर्णय आयोगाने घेतला. ही परीक्षा योजना २०२३ मधील परीक्षांच्या मुख्य परीक्षेकरिता लागू असेल. काही दिवसांपूर्वीच राज्य सेवा पूर्व परीक्षेतील पेपर क्रमांक २ (CSAT) अर्हताकारी केला होता. सदर निर्णयाची अंमलबजावणी दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ पासून करण्यात येत आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धत २०२३ पासून लागू असेल, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी याला विरोध झाल्यामुळे २०२५ पासून तो लागू झाला. त्यानंतर वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा वर्णनात्मक पद्धतीला विरोध करून वस्तूनिष्ठ पद्धतीने परीक्षा घ्यावी अशी मागणी पुढे येत आहे.

विद्यार्थ्यांनी कुठली नवीन चळवळ सुरू केली

राज्यसेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ (बहुपर्यायी) पद्धतीने घ्यावी की वर्णनात्मक पद्धतीने, याबाबत महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षार्थ्यांचे व्यापक मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अधिकृत टेलिग्राम चॅनलवर ‘लाइव्ह व्होटिंग’ घेण्यात यावे, अशी मागणी परीक्षार्थ्यांकडून करण्यात आली आहे. आयोगाच्या टेलिग्राम चॅनलला मोठ्या संख्येने विद्यार्थी जोडलेले असल्याने त्यांच्या मताचा थेट कौल घेण्यासाठी हे माध्यम प्रभावी ठरू शकते, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.यासंदर्भात परीक्षार्थ्यांच्या वतीने मुख्यमंत्री कार्यालय, एमपीएससीतील उच्चपदस्थ अधिकारी आणि मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. बैठकीची तारीख आणि वेळ आधी निश्चित करून, त्याच वेळी आयोगाच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवर मतदान सुरू करावे, अशी सूचना निवेदनात करण्यात आली आहे.

काही निवडक प्रतिनिधींच्या मतांऐवजी व्यापक कौल

मतदानाची पूर्वसूचना विद्यार्थ्यांना आयोगाच्या अधिकृत टेलिग्राम चॅनलवरून देण्यात यावी. निश्चित वेळेला सुरू होणाऱ्या मतदानाचा प्रतिसाद बैठकीच्या ठिकाणी मोठ्या पडद्यावर ‘लाइव्ह’ दाखवावा. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील विद्यार्थी प्रत्यक्ष मतदान करत असताना त्यांचा प्रतिसाद शासन आणि आयोगाच्या अधिकाऱ्यांना पाहता येईल, अशी भूमिका परीक्षार्थ्यांनी मांडली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पद्धतीबाबत काही निवडक विद्यार्थी किंवा संघटनांच्या मागण्यांवरून संपूर्ण परीक्षार्थी समुदायाचे मत ठरविण्याऐवजी व्यापक पातळीवर थेट मतदान घेणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील तसेच विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतील परीक्षार्थी या परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे त्यांचे मत थेट जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे परीक्षार्थ्यांचे म्हणणे आहे.
मतदानाचा निकाल पारदर्शकपणे नोंदवून भविष्यात राज्यसेवा मुख्य परीक्षा तसेच अन्य स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीबाबत निर्णय घेताना त्याचा विचार करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

बदलाचे नेमके कारण काय

सुधारणा समिती समोर प्रत्येक ठिकाणी वर्णनात्मक पद्धतीला विरोध करून वस्तुनिष्ठ पद्धतीची मागणी केली जात आहे. त्यामुळे समिती वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीची शिफारस करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास आगामी काळात आयोगाकडून राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये या नवीन पद्धतीचा पुन्हा अवलंब होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *