Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

‘अंगण दत्तक’ योजनेमधून सार्वजनिक जागांचे पालकत्व; ‘सुगंधी शहर’ अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद, १०० हून अधिक अंगण दत्तक पालकांचा सहभाग

मुंबई : स्वच्छता ही केवळ महापालिकेची जबाबदारी न राहता नागरिकांनीही सार्वजनिक जागांचे पालकत्व स्वीकारावे, या उद्देशाने नवी मुंबईत ‘सुगंधी शहर अभियान-अंगण दत्तक योजना २०२६’ सुरू करण्यात आली आहे.

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नुकत्याच झालेल्या या अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमात १०० हून अधिक नागरिकांनी अंगण दत्तक घेण्यास पुढाकार घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत नवी मुंबई घडविण्याचा संकल्प करण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुमारे १२०० नागरिक उपस्थित होते. विविध क्षेत्रांतून अंगण दत्तक घेणाऱ्या पालकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

नवी मुंबईने स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रात प्रथम आणि देशात तिसरा क्रमांक मिळविला आहे. आता शहराला देशातील स्वच्छतेत अग्रस्थानी नेण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. ‘स्वच्छतेला सुगंधाची जोड’ देणारी ‘सुगंधी शहर’ ही संकल्पना त्यादृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. नागरिक, संस्था आणि विविध घटकांनी अंगण दत्तक घेऊन या उपक्रमाला जनसहभागाचे स्वरूप दिले असून, ही संकल्पना देशात तसेच जागतिक स्तरावरही आदर्श ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना उपमहापौर दशरथ भगत यांनी सांगितले की, ‘वास्तू, जागा आणि व्यक्ती’ हे या अभियानाचे तीन प्रमुख घटक आहेत. नागरिकांनी आपल्या निवासी किंवा व्यावसायिक वास्तूच्या आसपासची केवळ १० ते १५ फुटांची सार्वजनिक जागा स्वयंस्फूर्तीने स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी भावना नागरिकांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

दत्तक घेतलेल्या सार्वजनिक जागेची स्वच्छता, सौंदर्य, सुरक्षितता आणि पर्यावरणीय संवर्धन यासाठी योगदान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ‘जबाबदारी हेच कर्तव्य’ या भावनेतून अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भगत यांनी केले.महापौर सुजाता पाटील यांनीही नागरिकांच्या सहभागातून ‘सुगंधी शहर’ ही संकल्पना पुढे नेण्याची गरज व्यक्त केली. शहरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नवी मुंबईची स्वच्छता आणि सुगंधाची अनुभूती घेऊन परतावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एका क्लिकवर घेता येणार अंगण दत्तक

नागरिकांना सार्वजनिक जागा दत्तक घेण्यासाठी https://www.sugandhishahar.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर नोंदणी करून नवी मुंबईतील सार्वजनिक जागेचे पालकत्व स्वीकारता येणार आहे. नवी मुंबईशी जिव्हाळा असलेल्या शहराबाहेरील व्यक्तींनाही या माध्यमातून सहभागी होता येणार आहे.

कार्यक्रमाला खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, सभागृह नेते सागर नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, माजी महापौर सुधाकर सोनावणे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते. विविध क्षेत्रांतील सात अंगण दत्तक पालकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *