वीरपत्नी कल्पना पवार बनल्या पोलीस उपअधीक्षक; शहीद पती अंबादास पवार यांच्या स्वप्नांची पूर्ती

सातारा: मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले पोलीस शिपाई अंबादास पवार यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करत, त्यांची पत्नी कल्पना पवार यांनी स्वतः खाकी वर्दी धारण केली आहे.
पतीच्या बलिदानातून प्रेरणा घेत त्यांनी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) म्हणून पोलीस दलात प्रवेश केला असून, त्यांच्या या प्रवासाने त्याग, धैर्य आणि देशप्रेमाचा एक नवा अध्याय लिहिला आहे.
दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांचे प्राण वाचवताना अंबादास पवार हुतात्मा झाले होते. या दुःखाने खचून न जाता, कल्पना पवार यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत लढा सुरू ठेवला. त्यांच्या १७ वर्षांच्या निरंतर प्रयत्नांनंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना २२ एप्रिल २०२५ रोजी थेट नियुक्तीचा आदेश देण्यात आला.
महाराष्ट्र पोलिसांच्या ‘सीपीटीपी १०’ अंतर्गत नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
कवठेगावच्या परंपरेला नवा उजाळा
कल्पना पवार या वाई तालुक्यातील ऐतिहासिक कवठेगावच्या स्नुषा आहेत. देशभक्त किसन वीर (आबासाहेब वीर) यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा लाभलेल्या या गावाने स्वातंत्र्यापासून राष्ट्रसेवेची परंपरा जपली आहे. आता कल्पना पवार यांच्या पोलीस दलातील उच्चपदस्थ नियुक्तीमुळे कवठे गावच्या देशसेवेच्या परंपरेला एक नवा अर्थ आणि गौरव प्राप्त झाला आहे. अंबादास पवार यांचे सर्वोच्च बलिदान आणि संकटानंतर खंबीरपणे उभ्या राहून पोलीस दलात अधिकारी म्हणून रुजू झालेल्या कल्पना पवार यांचा हा प्रवास, केवळ एका कुटुंबाची कहाणी नसून, महाराष्ट्राच्या खाकी वर्दीच्या कर्तव्याची आणि अस्मितेची उज्ज्वल परंपरा आहे.



