मतदार यादीतील दुरुस्तीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत संधी; एसआयआरअंतर्गत प्रारूप यादीवर दावे-हरकती दाखल करता येणार, ४ नोव्हेंबरला अंतिम यादी

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत नवी मुंबईतील सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी तसेच चुकीच्या किंवा दुबार नोंदींवर हरकत घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत.
त्यामुळे मतदारांनी प्रारूप यादी तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या करून घेण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे.
मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट रोजी सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींची छाननी करून २९ ऑक्टोबरपर्यंत त्यांचा निपटारा केला जाणार असून, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
तीन प्रकारचे अर्ज
मतदार यादीत पात्र व्यक्तीचे नाव नव्याने समाविष्ट करण्यासाठी किंवा यादीतून सुटलेल्या पात्र नागरिकाच्या नोंदणीसाठी नमुना ६ मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीतील चुकीच्या अथवा दुबार नावावर हरकत घेण्यासाठी तसेच नाव वगळण्यासाठी नमुना ७ वापरता येणार आहे. तर नाव, वय, पत्ता, छायाचित्र आदी तपशीलांमध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठी नमुना ८ मध्ये अर्ज करता येईल.
दावे व हरकती दाखल करण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज साद करता येणार आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या Voter Services Portal, ECINET किंवा Voter Helpline या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
नवमतदारांनीही नाव तपासावे
मतदार यादीत नाव नोंदविणे, नावातील अथवा अन्य तपशीलांतील त्रुटी दुरुस्त करणे यासाठी पात्र नागरिकांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. ३० सप्टेंबरनंतर दावे-हरकतींची मुदत संपणार असल्याने त्यापूर्वीच आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



