पुण्यातील नऱ्हेत पाेलिसांकडूनच रुग्णालयाजवळ डीजेचा धिंगाणा; पोलीस आयुक्तांच्या आवाहनालाच केराची टोपली

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हेतील एका रुग्णालयाजवळ पोलिसांकडूनच डीजेचा धिंगाना घातल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवाच्या काळात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचे व शांतता राखण्याचे आवाहन केले होते.
मात्र, त्यांच्या या आवाहनाला खुद्द नऱ्हे पोलिस ठाण्यानेच केराची टोपली दाखवली आहे. याप्रकरणी आता जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर पोलिस आयुक्तांकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
नऱ्हे पोलिस ठाणे, नऱ्हेच्या वतीने आयोजित गणेशोत्सव मिरवणुकीत सर्व नियम धाब्यावर बसवून उच्च तीव्रतेचा डीजे वाजवण्यात आला. विशेष म्हणजे, हे पोलिस ठाणे नवले हॉस्पिटलच्याच इमारतीत आहे. रुग्णालयाच्या अत्यंत संवेदनशील भागात वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या उपस्थितीतच माेठ्या आवाजात डिजेवर ‘पिचली माझी बांगडी’, ‘देव माझ्यावरती रुसला’ अशा गाण्यांवर पोलिसांचे नृत्य सुरू होते. रुग्णालयातील गंभीर रुग्णांना या कर्णकर्कश आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
सामान्य गणेश मंडळांना मिरवणूक व साऊंड सिस्टीमच्या परवानगीसाठी पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवावे लागतात. मग नऱ्हे पोलिसांच्या या डीजे मिरवणुकीला परवानगी होती का? सर्वसामान्यांच्या मंडळांवर डेसिबल मीटर घेऊन धाडी टाकणारे पोलिस स्वतःच्या डीजेची डेसिबल मर्यादा पाळली होती का? असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. नवले हॉस्पिटलसारख्या रुग्णालयाच्या परिसरात ध्वनिप्रदूषणाचे नियम उघड्या डोळ्यांनी मोडणाऱ्या पोलिसांवर सायलेन्स झोनच्या नियमांनुसार कारवाई होणार का?
आयुक्त अमितेश कुमार यांच्या भूमिकेकडे लक्ष!
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेशोत्सवापूर्वी घेतलेल्या बैठकांमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला होता. परंतु, त्यांच्याच विभागातील अधिकारी व कर्मचारी जर अशा प्रकारे कायद्याची थट्टा उडवणार असतील, तर सर्वसामान्यांमध्ये पोलिसांचा धाक कसा राहणार? या घटनेमुळे सोशल मीडियावर पोलिसांच्या दुटप्पी धोरणावर प्रचंड टीका होत असून खाकीची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे केवळ स्पष्टीकरण मागवून न थांबता, पोलिस आयुक्तांनी नऱ्हे पोलिस ठाण्याच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून कडक कारवाई करावी, तरच प्रशासनाचा धाक आणि नियमांची चौकट टिकून राहील, असा सूर नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
नऱ्हे पोलिस ठाण्याच्या श्रींची मिरवणूक प्रशासकीय परवानगी घेऊन व सर्व शासकीय नियमांचे पालन करत पार पडली आहे. ध्वनी मर्यादेचे काटेकोर पालन करण्यात आले असून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती. – वर्षा देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नऱ्हे पोलिस ठाणे



