Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

रिलीजला अजून 1 वर्ष बाकी, तरीही अल्लु अर्जुनच्या ‘राका’ ची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, कोणता केला विक्रम?

आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून अल्लू अर्जुनने केवळ दक्षिण भारतीय किंवा भारतीयच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनातही स्वतःचे एक खास स्थान निर्माण केले आहे; आज त्याचा चाहतावर्ग जगाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेला आहे.

‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा 2’ सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्यानंतर, अल्लू अर्जुन आता दीपिका पादुकोणसोबत ‘राका’ या चित्रपटात झळकणार आहे. प्रेक्षक आगामी ‘राका’ या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतानाच, हा चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने इतिहास रचला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून साधारण वर्षभराचा कालावधी बाकी असला, तरी त्याचे नाव आधीच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंदवले गेले आहे.

‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद

‘सन पिक्चर्स’च्या बॅनरखाली आणि जवान फेम ॲटली कुमार याच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘राका’ या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अल्लू अर्जुन आणि ॲटली कुमार यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ‘सन पिक्चर्स’ने प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे. ‘राका’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले स्थान निर्माण केले आहे; यासाठी एकाच वेळी 37 कलाकारांसोबत ‘मोशन कॅप्चर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

सन पिक्चर्सची पोस्ट

सन पिक्चर्सने शेअर केलेल्या फोटोमध्ये ॲटली आणि अल्लू अर्जुन ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र हातात धरलेले दिसत आहेत. यासोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे: “इतिहास घडला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेणारा हा एक जागतिक विजय आहे! ‘राका’ चित्रपटाने ‘रिअल-टाइम मोशन कॅप्चर’द्वारे सर्वाधिक लोकांचे चित्रण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यात एकाच वेळी 37 कलाकारांचे चित्रण करण्यात आले. या कामगिरीसाठी अल्लू अर्जुन आणि ॲटली यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले आहे.”

‘राका’ चित्रपटातील कलाकार आणि रिलीजची तारीख

‘राका’बद्दल बोलायचे झाल्यास, ‘जवान’ फेम दिग्दर्शक ॲटली याच्या दिग्दर्शनाखालील तयार होणाऱ्या या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असेल, तर दीपिका पदुकोण एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. 8 एप्रिल रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाची घोषणा केली आणि अल्लू अर्जुनचा ‘फर्स्ट-लुक’ पोस्टर प्रदर्शित केला, ज्यामध्ये या सुपरस्टारचा एक वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण लुकमध्ये पाहायला मिळाला. या पोस्टरमध्ये लांडग्यासारखा हात आणि त्याची मोठी, तीक्ष्ण नखे चेहऱ्याला झाकताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *