Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

सलमान खानचं स्पर्धकाला धडा शिकवायला नाटक पण बिग बॉसने एडिटिंगमध्ये घातला घोळ, भाईजानचं तब्येतीबाबत स्पष्टीकरण

बाॅलिवूडचा सुपरस्टार सलमान खान अलीकडे ‘बिग बॉस 20’ मुळे चर्चेत आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या ‘वीकेंड का वार’च्या एपिसोड दरम्यान, त्याला अचानक छातीत दुखू लागल्याने चाहते आणि स्पर्धक चिंतेत पडले होते.

चालू शूटमध्ये हा प्रकार घडला होता. त्यात सलमानला तीव्र वेदना होत असल्याचे दिसून आले आणि त्याने सेटवर डॉक्टरांना बोलावण्यास सांगितले; त्याच्या या अवस्थेमुळे सर्वांचीच चिंता वाढली होती. आता सलमानने आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

सलमान खानने दिली आरोग्याबाबतची माहिती

सलमान खानची प्रकृती आता उत्तम आहे, त्यामुळे काळजी करण्याचे काहीच कारण नाही. ‘भाईजान’ने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना आपल्या आरोग्याबद्दल माहिती दिली. अभिनेत्याने लिहिले, “देवाच्या कृपेने माझी प्रकृती अगदी ठीक आहे. ‘बिग बॉस’चा प्रोमो ज्या पद्धतीने एडिट केला गेला, तसा तो करायला नको होता. त्यामुळे त्यामागचा मूळ उद्देशच हरवला आणि असे वाटले की, घरात काझी जी कृती करत होता, तीच मीही करत होतो. काझीने जे केले म्हणजेच मनोरंजनासाठी आपल्या आरोग्याचा वापर करणे ते चुकीचे होते, हे त्याला दाखवून देणे हाच माझा एकमेव उद्देश होता; कारण घरातील इतर 15 सदस्यांना तो केवळ अभिनय करत आहे याची कल्पना नव्हती आणि ते त्याच्या प्रकृतीबद्दल खरोखरच चिंतेत होते. प्रोमो ज्या प्रकारे एडिट केला गेला, त्याबद्दल मी माफी मागतो. शोच्या प्रसिद्धीची ही त्यांची पद्धत असावी असे दिसते; त्यांच्या वतीने मी माफी मागतो.”

बिग बॉसने परिस्थिती सावरली

यासोबतच, सलमानने बिग बॉसचे आभार मानणारी आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सलमान खानने लिहिले, “बिग बॉसने परिस्थिती सावरली. धन्यवाद, बिग बॉस.” आता यावरुन हे स्पष्ट झाले आहे की सलमान खान पूर्णपणे ठीक आहे. काझीला धडा शिकवण्यासाठी आणि विशेषतः त्याला परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्याने केवळ आजारी असल्याचे नाटक केले होते.

बिग बॉसच्या सेटवर नक्की काय घडले?

‘बिग बॉस 20 ‘ च्या ‘वीकेंड का वार’ या भागादरम्यान सलमान खान स्पर्धकांशी संवाद साधत असताना त्याला अचानक छातीत वेदना जाणवू लागल्या. वेदना सुरू होताच त्याने पाणी मागितले. पाणी प्यायल्यानंतर तो सावरल्यासारखा वाटला आणि त्याने पुन्हा स्पर्धकांशी बोलायला सुरुवात केली; मात्र, थोड्याच वेळात छातीतली वेदना पुन्हा बळावली आणि तो बोलता-बोलता अचानक थांबला. सलमानला वेदनेने व्याकूळ झालेले पाहून घरातील स्पर्धक चिंतेत पडले. वेदना इतकी तीव्र झाली की, त्याने थेट सेटवरच डॉक्टरांना बोलावण्याबद्दलही बोलून दाखवले.

कतरिनाला ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल

याशिवाय सलमान खानने अभिनेत्री कतरिना कैफला तिच्या प्रेग्नंसी नंतरच्या लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांनाही खडेबोल सुनावले. ती जेव्हा सिनेमांत पुनरागमन करेल तेव्हा ती नक्कीच फिट दिसेल असे आवाहन सुद्धा त्याने केले. यावेळी त्याने त्याला म्हातारा म्हणणाऱ्यांनाही चांगलेच धारेवर धरले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *