मुंबईतील झोपड्यांवर पालिकेची नजर! १४ फूटांपेक्षा उंच बांधकामांवर १ ऑक्टोबरपासून कारवाई

मुंबई: मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील अनधिकृत बांधकामांवर चाप बसविण्यासाठी महानगरपालिका १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम राबविणार आहे.
या अंतर्गत, १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा – लवंगारे यांच्या मार्गदर्शनात, सह आयुक्त (दक्षता) देवेंदर सिंग यांच्या नेतृत्वात अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई केली जात आहे. याच अनुषंगाने, झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या आहेत. त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे निर्दशनास आले आहे. यापैकी ३ हजार ३४८ झोपड्या शहर विभाग, ४ हजार ५३६ झोपड्या पश्चिम उपनगरे आणि ३१ हजार २२७ झोपड्या पूर्व उपनगरांत स्थित आहेत.
दरम्यान, ४ हजार ५८४ झोपड्यांवर यापूर्वी निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. ६११ झोपड्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित झोपड्यांत वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांनी संबंधित बांधकामे स्वतःहून तत्काळ निष्कासित करावीत अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
झोपडपट्टी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तिथे वास्तव्यास असलेल्या संबंधित रहिवाश्यांनी स्वतःहून तत्काळ निष्कासित करावीत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



