नाना पेठेत गणेशोत्सवाचे वैविध्यपूर्ण रंग; बारा ज्योतिर्लिंगांपासून ‘अजितपर्वा’पर्यंत देखावे लक्षवेधी

पुणे: एकाच ठिकाणी देशातील बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन… आकर्षक महादेव रथ… गाण्यांच्या तालावर नाचणारी विद्युतरोषणाई… फुलांची मनमोहक सजावट, तर दुसरीकडे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासकामांचा आढावा मांडणारे प्रदर्शन… अशा वैविध्यपूर्ण देखाव्यांनी नाना पेठेतील गणेशोत्सव यंदा लक्षवेधी ठरत आहे. धार्मिक आणि प्रबोधनात्मक देखाव्यांबरोबरच काही मंडळांनी आकर्षक सजावटीवर भर दिला असून, अनेक मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यास प्राधान्य दिले आहे.
देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
वीर महाराणा मित्रमंडळाने ‘बारा ज्योतिर्लिंग’ हा धार्मिक देखावा साकारला आहे. देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती एकाच ठिकाणी उभारण्यात आल्याने भाविकांना त्यांच्या दर्शनाची अनुभूती मिळत आहे. मंडळाची आकर्षक गणेशमूर्तीही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासोबतच बारा ज्योतिर्लिंगांचा देखावा पाहण्यासाठी भाविकांची पावले मंडळाकडे वळत आहेत. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराने ‘विकासाचे अजितपर्व’ हा देखावा साकारला आहे.
यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीतून पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या लहान प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. तसेच, देखाव्यातील अजितदादांचा पुतळाही लक्ष्य वेधून घेतो. याखेरीज, अन्य माहिती देणारे फ्लेक्सरूपी छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले आहे. विविध विकासकामांची छायाचित्रे आणि त्यासंदर्भातील माहिती नागरिकांना या प्रदर्शनातून पाहता येत आहे.



