Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

सीएसएमटी कुर्लादरम्यान पाचव्या – सहाव्या मार्गिकेतील अडथळा दूर; शीव उड्डाणपुलाचे रेल्वेहद्दीतील काम पूर्ण

मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढविणाऱ्या सीएसएमटी ते कुर्लादरम्यान पाचवी-सहावी मार्गिका प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. शीव उड्डाणपुलाच्या रेल्वे हद्दीतील सर्व कामे मध्य रेल्वेने पूर्ण केली असून, नव्या एकेरी स्पॅनमुळे दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिकांसाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे.

आता पुलाच्या जोडरस्त्यांची कामे मुंबई महापालिकेकडून अंतिम टप्प्यात करण्यात येत असून, सप्टेंबरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची अपेक्षा आहे.

सीएसएमटी ते कुर्ला दरम्यानच्या पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका गेली तब्बल १६ वर्षे प्रलंबित आहे. अनेक ठिकाणी भूसंपादन, रहिवाशांचे पुनर्वसन, प्रशासकीय मंजुरी आणि निधीची उपलब्धता या कारणाने हा प्रकल्प रेंगाळत गेला. यातच जुन्या शीव उड्डाणपुलामुळे पाचवी आणि सहावी मार्गिका वाढविणे शक्य होत नव्हते. तसेच मुंबईतील जुन्या आणि ब्रिटिशकालीन पुलांची तपासणी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आयआयटी) यांच्याद्वारे केली असता, तब्बल ११२ वर्षे जुन्या उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत जीर्ण असल्याचे समोर आले.

त्यामुळे ऑगस्ट २०२४ पासून शीव उड्डाणपुलाचे पुनर्बांधणीचे काम हाती घेतले. जुन्या दोन-स्पॅन पुलाऐवजी रेल्वे मार्गावर ५४.५ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा एकेरी स्पॅन पूल उभारण्यात आला आहे. पुलासाठी प्रत्येकी सुमारे ५०० टन वजनाचे दोन स्टील गर्डर जून आणि ऑगस्टमधील विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉकदरम्यान बसविण्यात आले. त्यानंतर डेक स्लॅबसह रेल्वे हद्दीतील उर्वरित सर्व कामे पूर्ण करण्यात आली.

मार्गिका प्रकल्पाला गती

– मुंबईतील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढविणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या १७.५ किमीच्या प्रकल्पात कुर्ला-परळ हा १०.१ किमीचा पहिला टप्पा प्रगतिपथावर असून, परळ-सीएसएमटी या ७.४ किमीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भूसंपादन सुरू आहे.

– पहिल्या टप्प्यातील १२ पैकी एक लहान पूल आणि चारपैकी दोन स्थानक इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. नव्या एकेरी स्पॅनमुळे भविष्यातील दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिकांसाठी जागा निर्माण झाली आहे. या मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढण्यास आणि गर्दीच्या मार्गावरील वाहतूक नियोजन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल.

– रेल्वे हद्दीतील काम पूर्ण झाले असले, तरी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यांची कामे पालिकेद्वारे सुरू आहेत. ती कामेपूर्ण झाल्यानंतर आवश्यक तांत्रिक परवानग्या आणि वाहतूक व्यवस्थेची पूर्तता करून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

वाहतुकीसाठी सर्वसामान्यांना दिलासा

धारावी, वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी), कुर्ला एलबीएस मार्ग आणि शीव परिसराला जोडणारा शीव उड्डाणपूल वाहतुकीसाठी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यास, विद्यार्थी, छोटे व्यापारी, वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण यांना मोठा दिलासा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *