Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Amol Khune On Manoj Jarange : मनोज जरांगेंना कुणी पैसे पुरवले? हजारो कोटींची प्रॉपर्टी कशी जमवली? जुन्या सहकऱ्यानेच उणं धुणं काढलं!

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी 17 सप्टेंबर रोजी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर आपले उपोषण 90 दिवसांसाठी स्थगित केले.

मात्र, आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारला तीन महिन्यांची मुदत देत मागण्यांवर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जरांगेंच्या या निर्णयानंतर त्यांचे माजी सहकारी अमोल खुणे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली असून अनेक गंभीर आरोप केले आहेत.

“आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची नावं ईडीच्या चौकशीत बाहेर येतील” –

माध्यमांशी बोलताना अमोल खुणे यांनी आंदोलनाला कथितरित्या रसद आणि आर्थिक मदत करणाऱ्यांबाबत गंभीर आरोप केले. “आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची नावे घेता येत नाहीत. ईडीच्या चौकशीत कोणाकडून पैसे आले, कोणी रसद पुरवली हे समोर येईल,” असा दावा त्यांनी केला. यावेळी खुणे यांनी मंत्री अब्दुल सत्तार आणि आमदार संजय शिरसाट यांच्याबाबतही आरोप केले. अब्दुल सत्तार यांनी सहा कोटी रुपये दिल्याचा दावा करत, शिरसाट यांना लक्ष्य करण्यासाठी ही कथित रक्कम वापरली गेल्याचे खुणे म्हणाले.

“जरांगे यांनी माझ्यासमोर बसावं” –

मनोज जरांगे यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांवरही खुणे यांनी भाष्य केले. “मनोज जरांगे जर खरे असतील तर त्यांनी माझ्यासमोर बसावे. दोघांनी समोरासमोर चर्चा करावी. मी चुकीचा ठरलो तर समाज जी शिक्षा देईल ती स्वीकारण्यास तयार आहे,” असे ही खुणे म्हणाले. आपल्याविरोधात केलेले आरोप चुकीचे असल्यास अब्रूनुकसानीचा दावा दाखल करावा, असे आव्हानही खुणे यांनी दिले. जरांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांबाबत कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका खुणे मांडली.

“पुढच्या उपोषणाला शिष्टमंडळ येणार नाही” –

जरांगेंच्या पुढील उपोषणाबाबतही अमोल खुणे यांनी दावा केला. “पुढच्या उपोषणाला शिष्टमंडळ येणार नाही, कुठला मंत्री येणार नाही,” असे ते म्हणाले. तसेच जरांगे यांच्यावर आंदोलनादरम्यान भावनिक वातावरण निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वीही खुणे यांनी जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एप्रिल 2026 मध्ये त्यांनी जरांगेंना थेट आव्हान देत आपल्यावरील आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्या वेळीही त्यांनी जरांगेंच्या चौकशीची मागणी केली होती.

“मराठा इतिहासात अशा पद्धतीने लढाया लढल्या गेल्या नाहीत” –

खुणे यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही टीका केली. “मराठ्यांच्या इतिहासात एवढ्या लढाया झाल्या, युद्धे झाली; एक तरी मावळा मोहिमेवर रडत गेला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जरांगे यांच्या आंदोलनाला त्यांनी “नाटक” असे संबोधत ते थांबले पाहिजे, असेही म्हटले.

“जरांगे यांनी समाजाला भावनिक करू नये” –

जरांगे यांच्या वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ देत खुणे यांनी केलेल्या वक्तव्यांवरूनही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांनी जरांगे यांच्यावर समाजाला भावनिक करण्याचा आरोप केला आणि आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या भावनांचा वापर करू नये, अशी टीका केली. दरम्यान, मनोज जरांगे यांनी 17 सप्टेंबर रोजी उपोषण स्थगित करत सरकारला 90 दिवसांची मुदत दिली आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांनुसार पुढील कार्यवाही न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *