Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

ST आरक्षणासाठी बंजारा समाजाचे येलदरी धरणात प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन; जलाशयाला छावणीचे स्वरूप

प्रशांत मुळे येलदरी वसाहत (जि. परभणी) : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करावे आणि इतर प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात, यासाठी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात बंजारा समाज आक्रमक झाला आहे.

प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) दुपारी दोन वाजता पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी जलाशयात हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत ‘प्रतीकात्मक जलसमाधी आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनामुळे येलदरी धरण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

​विनोद आडे यांच्या उपोषणाचा १३ वा दिवस जिंतूर शहरातील स्व. वसंतराव नाईक चौक येथे विविध मागण्यांसाठी विनोद विश्वनाथ आडे हे गेल्या १३ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, वारंवार निवेदने देऊनही शासन व प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याने समाजबांधवांमध्ये तीव्र संताप आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारला जागे करण्यासाठी हजारो समाजबांधवांनी येलदरी धरण गाठून पाण्यात उतरत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

​आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या : ​एसटी आरक्षण : बंजारा समाजाचा तातडीने अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करून अधिकृत अधिसूचना काढावी. ​उपोषणाची तातडीने दखल : १३ दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेले विनोद आडे यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेऊन शासनाने अधिकृत चर्चा सुरू करावी. ​दाखल गुन्हे मागे घ्यावेत : १२ सप्टेंबर रोजी झालेल्या रस्ता रोको आंदोलनाप्रकरणी उपोषणकर्ते विनोद आडे, ॲड. विनोद राठोड, विजय आडे व विशाल चव्हाण यांच्यावर दाखल केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेण्यात यावेत. ​प्रशासकीय चर्चा : ४, १२ आणि १६ सप्टेंबर रोजी सादर केलेल्या निवेदनांवर शासनाने सकारात्मक निर्णय घेत आंदोलक प्रतिनिधींशी थेट चर्चा करावी.

​तगडा बंदोबस्त, प्रशासनाची उडाली धावपळ कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिंतूर व परभणी पोलिसांनी येलदरी धरणावर चोख बंदोबस्त तैनात केला होता. नायब तहसीलदार प्रशांत राखे, पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी, बीट जमादार दत्तात्रय गुंगाणे आणि येलदरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद शहाबाज यांच्यासह महसूल, पोलीस व आरोग्य पथके घटनास्थळी तैनात होती. आंदोलन शांततापूर्ण मार्गाने पार पडले असले तरी, शासनाने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा सकल बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *