खासदार धनंजय महाडिक यांनी आमची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला; हसन मुश्रीफ यांचा थेट आरोप, गोकुळ संघात अंतर्गत घडामोडींना वेग

कोल्हापूर : महायुतीच्या संस्था असताना त्यांना न्यायालयीन संघर्ष का करावा लागला, हे अनाकलनीय आहे. मात्र, आमची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून झाला.
मात्र, आम्ही सभासद संख्या कमी होऊ दिली (Gokul Election 2026) नाही. यामुळे काही संस्था नाराज झाल्या आहेत; पण, त्यांची नाराजी दूर करू, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुश्रीफांनी सांगितलेल्या सभासदांच्या आकडेवारीत भाजपला गृहीत धरलेले नाही, असा आरोप खासदार महाडिक यांनी पत्रकाद्वारे केला होता. याबद्दल विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘ज्या संस्थांना न्यायालयात जावे लागले, त्यातील बहुतांशी संस्था महायुतीच्या होत्या. अद्याप अदृश्य शक्ती कोण? हे समजले नाही. महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही. आम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढणार आहोत.’
गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार का? यावर ते म्हणाले, ‘एकंदरीत चित्र पाहता ‘गोकुळ’ची ही निवडणूक बिनविरोध होईल, असे वाटत नाही. कारण इतक्या लोकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत आणि इतके दावे-प्रतिदावे आहेत, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्य आहे. मुख्यमंत्र्यांशी अद्याप बैठक झालेली नाही. सात किंवा आठ तारखेला ही बैठक होईल. त्यानंतर जागा वाटपाबाबत नक्की ठरेल.’ सत्तेत असूनही मुश्रीफांना त्रास का?, या आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘त्यांचा हा सवाल बरोबर आहे. हे कोडे अजूनही आम्हाला उलगडलेले नाही.’
पदवीधरची जागा आमची
पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिला आहे. प्रा. शरद पाटील, अरुण लाड हे निवडून आले आहेत. सारंग पाटील आणि अरुण लाड यांनी मदत केल्यामुळेच चंद्रकांत पाटील निवडून आले होते. लाड यांचा मुलगा जरी भाजपमध्ये गेला असला तरी आमदार अरुण लाड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी गेल्यावेळी भैय्या माने यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे सध्या तरी पुणे पदवीधर मतदारसंघावर आमचा हक्क असून, उमेदवारी पदरात पाडून घेऊ, असेही मुश्रीफ म्हणाले.



