Yavatmal Accident News: यात्रेत अंगावर काटा आणणारी घटना;आकाश पाळण्यात केस अडकून चक्क डोक्याची चामडीच सोलली

- फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी यात्रेत घटना
- आकाश पाळणा सुरू असताना महीलेचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकले
- नागरिकांनी जखमी महिलेला पुसद येथील खासगी रुग्णालयात केले दाखल
- यवतमाळ जिल्ह्याकमधील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे तान्हा पोळ्याच्या यात्रेदरम्यान आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचा भीषण अपघात झाला. पाळणा सुरू असताना महिलेचे केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकल्याने त्यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थित नागरिकांनी तातडीने पाळणा थांबवत महिलेला बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- नेमकी घटना काय?
फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी तान्हा पोळ्यानिमित्त यात्रा भरवण्यात आली होती. या यात्रेत बाली मारोती टाळीकोटे या सहभागी झाल्या होत्या. यात्रेचा आनंद घेण्यासाठी त्या आकाश पाळण्यात बसल्या. पाळणा सुरू झाल्यानंतर काही वेळातच त्यांचे केस पाळण्याच्या फिरत्या बेरिंगमध्ये अडकले. पाळणा सुरू असल्याने केस ओढले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे यात्रेत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
- नागरिकांनी तातडीने पाळणा थांबवला
महिलेच्या केसांमध्ये अडकल्याचे लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करून पाळणा थांबवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या मदतीने पाळणा थांबवण्यात आला आणि बाली टाळीकोटे यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने पुसद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
- यात्रेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- या घटनेमुळे यात्रेतील आकाश पाळणे आणि इतर मनोरंजनाच्या साधनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पाळण्यामध्ये केस, कपडे किंवा इतर वस्तू अडकू नयेत यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. यात्रेतील आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या अपघातामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.



