
लातूर, 10 सप्टेंबर। लातूर जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदींच्या आधारे पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आजपासून १७ सप्टेंबरपर्यंत महसूल मंडळस्तरीय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी तसेच नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी मराठा आरक्षणविषयक आंदोलनकर्ते व प्रतिनिधींशी संवाद साधला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या संवादादरम्यान कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र वाटपाच्या प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुलभता आणि गती आणण्यासाठी आंदोलनकर्ते व प्रतिनिधींच्या सूचना आणि अभिप्राय जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतले.
कुणबी नोंदी आढळलेल्या पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करता यावा, यासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान मंडळस्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच वंशावळीचे पुरावे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या कुणबी नोंदी ग्रामपंचायती तसेच जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांकडे याव्यतिरिक्त आणखी कुणबी नोंदी उपलब्ध असल्यास त्याबाबतची माहिती प्रशासनाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
जात प्रमाणपत्रासाठी अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे, वंशावळीचे पुरावे आणि अर्ज करण्याची पद्धत याबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी सर्व तहसीलदारांना दिल्या.
यावेळी उपस्थित मराठा आरक्षणविषयक प्रतिनिधींनी विविध सूचना आणि अभिप्राय मांडले. कुणबी जात प्रमाणपत्र वाटपासाठी नियुक्त जिल्हास्तरीय नोडल अधिकारी अहिल्या गाठाळ यांची यावेळी उपस्थिती होती. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.



