
पुणे, 10 सप्टेंबर । कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२७ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. पराग काळकर , कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, दीक्षान्त समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील विशेष क्षण असून या टप्प्यावर ज्ञानाचे रूपांतर जबाबदारीत आणि शिक्षणाचे नेतृत्वात होते. बदलत्या परिस्थितीत केवळ पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी आजीवन ज्ञानार्जन करत नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून समानता, सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा सावित्रीबाई फुले यांचा विचार विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा, असे आवाहनी त्यांनी केले.
श्री.वर्मा म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून बहुविषयक शिक्षण, कौशल्यविकास, संशोधन, नवोन्मेष, भारतीय ज्ञानपरंपरा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या बाबींना प्राधान्य द्यावे. डिजिटल प्रशासन आणि हरित उपक्रमांमुळे विद्यापीठ अधिक पारदर्शक, कार्यक्षम व शाश्वत होण्यास मदत होईल, असेही राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.
दुबई, सौदी अरेबिया आणि कझाकिस्तानमधील शैक्षणिक भागीदारीमुळे विद्यापीठाचा जागतिक विस्तार अधिक बळकट होऊ शकतो. आंतरराष्ट्रीयीकरणामध्ये विद्यार्थी देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक आणि जागतिक भागीदारीलाही महत्त्व द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठांनी उद्योग क्षेत्रासोबत भागीदारी वाढवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशिप, शिकाऊ उमेदवारी, संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. माजी विद्यार्थ्यांचे जाळेही अधिक सक्षम करून त्यांचा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, रोजगार, संशोधन आणि नवोन्मेषासाठी उपयोग करून घ्यावा, असे श्री.वर्मा म्हणाले.
कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्य, कृषी, सायबर सुरक्षा, शाश्वत विकास, ग्रामीण परिवर्तन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांतील संशोधनाला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक विद्यापीठाने वार्षिक क्रीडा दिनदर्शिका तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका क्रीडा किंवा शारीरिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. क्रीडा विद्यार्थ्यांना शिस्त, संघभावना आणि नेतृत्व शिकवते, असे राज्यपालांनी सांगितले.



