Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

विरारच्या केवल चौधरींची ऐतिहासिक कामगिरी; भागीरथी नदीतील ८१ किमी अंतर पार करत रचला विक्रम

वसई: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे आयोजित ८१ किलोमीटरच्या खडतर खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धेत विरारच्या केवल चौधरीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. भागीरथी नदीतील तब्बल ८१ किमीचे आव्हानात्मक अंतर यशस्वीपणे पार करत, अशी अद्भूत कामगिरी करणारा केवल हा पालघर जिल्ह्यातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात रविवारी, ६ सप्टेंबर रोजी ही स्पर्धा पार पडली. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत केवलने आपल्या जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ८१ किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. नदीचा वेगवान प्रवाह, बदलणारे हवामान आणि प्रदीर्घ वेळ पोहल्यामुळे शरीरावर येणारा प्रचंड ताण अशा विविध संकटांचा सामना करत त्याने आपली गती आणि आत्मविश्वास शेवटपर्यंत कायम ठेवला. या यशामागे अनेक महिन्यांची कठोर मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि योग्य नियोजन असल्याचे केवलने सांगितले. वसई-विरार क्षेत्रातील जलतरण तलावात त्याने या स्पर्धेसाठी आवश्यक शारीरिक क्षमता, स्टॅमिना आणि मानसिक कणखरतेवर विशेष भर दिला होता.प्रशिक्षक विद्यानंद मुळीक यांचे योग्य मार्गदर्शन, नियमित सराव आणि स्वतःवरील विश्वास यामुळेच हे कठीण ध्येय गाठणे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया केवल चौधरीने या यशानंतर व्यक्त केली. केवलच्या या यशामुळे वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *