लाल किल्ला नव्हे मंदिर होते लक्ष्य, मूत्रातून युरिया गोळा केल्याची शक्यता; NIA च्या आरोपपत्रात काय म्हटलंय?

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोट ११ जण ठार झाले तर अनेकजण जखमी झाले. या प्रकरणातील आत्मघाती हल्लेखोराने बॉम्ब तयार करण्यासाठी युरियाचा वापर केला असण्याची शक्यता देशाची प्रमुख दहशतवादविरोधी एजन्सी एनआयएने वर्तवली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे उमर उन नबीने यासाठी मूत्रातून युरिया वेगळा केला होता, राष्ट्रीय तपास यंत्रणाने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक पुरावे
एनआयएने नबीचा मुक्काम असलेले ठिकाण, त्याच्या हालचाली, मोबाईल फोनचा वापर आणि नूह येथील मुक्कामादरम्यान स्फोटक साहित्य तयार करण्याबाबतचे साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा केले आहेत, असे आरोपपत्रात म्हटले आहे. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या स्फोटात ११ जण ठार आणि अनेकजण जखमी झाले होते. नबीने स्फोटकांनी भरलेली आय-२० कार आधी लाल मंदिराजवळ (जैन मंदिर) उभी केली होती आणि नंतर तो लाल किल्ल्याकडे गेला होता, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
भाड्याच्या खोलीत सुमारे ११ दिवस मुक्काम
स्फोटाच्या एक दिवसाच्या अगोदरपर्यंत नबी नूह येथे एका भाड्याच्या खोलीत सुमारे ११ दिवस राहिला होता. येथेच त्याने स्फोटकं तयार केल्याचे साक्षीदाराने सांगितल्याचे आरोपपत्रात म्हटलंय. नबी आणि आणखी एक संशयित शाहीन सईद यांच्याकडे पेनड्राइव्हमध्ये सापडलेल्या पीडीएफमध्ये युरिया नायट्रेटचा वापर करून स्फोटके बनवण्याच्या पद्धतीचा उल्लेख असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. या दस्तऐवजांमध्ये लघवीमधून युरिया काढण्याची पर्यायी पद्धत असल्याचा दावाही एनआयएने केला आहे.
लघवीमधून जमवला युरिया
नबीकडे लघवीने भरलेली एक पॉलिथिन बॅग पाहिल्याचा आणि खोलीत दुर्गंधी सुटल्याची माहिती एका साक्षीदार महिलेने दिल्याचेही एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. संबंधित महिलेने याबाबत त्याची मैत्रीण शोएबकडे तक्रारही केली होती, असा दावा करण्यात आला आहे. नूह येथील मुक्कामादरम्यान नबी शोएबच्या एका नातेवाईकाबरोबर नवीन कपडे खरेदी करण्यासाठी बाहेर गेला होता. त्याने एक टी-शर्ट, एक पांढरा शर्ट आणि कार्गो पॅन्ट खरेदी केली होती, असा उल्लेखही आरोपपत्रात आहे. या खरेदीचे पैसे रोख स्वरूपात देण्यात आले होते. एनआयएच्या तपासात हे खरेदीचे पुरावे महत्त्वाचे मानले जात आहेत.
वाहतुकीमुळे बदलावा लागला प्लॅन
आरोपपत्रानुसार, आत्मघाती हल्लेखोराचे मूळ लक्ष्य लाल मंदिर असावे, परंतु दिल्लीतील वाहतुकीमुळे त्याला ऐनवेळी प्लॅन बदलावा लागला. नबी सायंकाळी ६:३७ वाजताच्या सुमारास सुनहरी मशीद पार्किंगमधून बाहेर पडला. त्याने कार लाल मंदिराजवळ पार्क करण्याचा प्रयत्न केला. पण, वाहतूक आणि पोलीस असल्याने त्याने यु-टर्न घेतला आणि लाल किल्ल्याजवळ पोहोचला, असे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच म्हणजेच ६:५० वाजता भीषण स्फोट झाला. नबीने २०२३ ते २०२५ या कालावधीत लाल किल्ल्याला १२ वेळा भेट दिली होते असे यापूर्वी एनआयएच्या तपासात असे समोर आले होते. स्फोटाच्या सहा महिने आधी म्हणजेच १ मे रोजी त्याने किल्ल्याला शेवटची भेट दिली होती.



