‘ओम नमः शिवाय’, ‘बम् बम् भोले’चा गजर करत श्री कपालेश्वर, श्री सोमेश्वरला भाविकांचा महापूर

क्षावण महिन्यात अतिशय पावित्र्य असलेल्या तिसऱ्या सोमवारनिमित्त भगवान महादेवाच्या दर्शनासाठी दिवसभर शहरातील विविध मंदिरांत हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या रांगा लागलेल्या होत्या.
‘हर हर महादेव’ आणि ‘बम् बम् भोले’ च्या जयघोषाने कपालेश्वर तसेच सोमेश्वर मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. शहरातील पातळेश्वर, नीळकंठेश्वर, तीळभांडेश्वर अशा विविध महादेव मंदिरांत भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
सोमेश्वर मंदिरातदेखील तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. हजारोहून अधिक भाविकांनी महादेवाचे दर्शन घेतले. अनेक संस्थांनी तेथे राजगिरा लाडू, साबुदाणा खिचडी, केळी अशा खाद्यपदार्थांचे फराळवाटप केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या हस्ते सोमेश्वर महादेवाची आरती करण्यात आली.
गोदाघाट पहाटेपासून गर्दनि फुलून गेला होता. बेलफूल, तुळशीची पाने आणि पूजासाहित्य घेऊन हजारो महिला, तरुणी, तरुण गोदाघाटावर आले होते. कपालेश्वर मंदिरात पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. त्यातच सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याने गोदाघाट सोनेरी किरणांनी उजळून निघाला आणि परिसर ‘बम् बम्’ भोलेच्या जयघोषाने क्षणोक्षणी दुमदुमत होता. सकाळी ९ नंतर तर प्रचंड गर्दी वाढल्याने पोलिसांची मालेगाव स्टॅण्ड परिसरात धावपळ उडाली. गर्दीने वाहतूक कोलमडू नये, यासाठी पंचवटी परिसरात गंगेकडे येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. दर्शनानंतर हजारो तरुण-तरुणींनी गोदाघाट परिसरात कपाळावर महादेव, ओम, त्रिशूळ चिन्ह टिळा तेथे उपस्थित असलेल्या टिळेकऱ्यांकडून रंगवून घेतले. मंदिरातून बाहेर पडताना तरुण-तरुणींच्या जत्थ्यांनी चालविलेल्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते. रात्री ११ पर्यंत हा उत्साह टिकून होता.
त्यात वरुणराजाने विश्रांती घेतल्याने आणि दुपारी ऊन पडल्याने गोदातीरी खरोखरी श्रावणातील निसर्ग अवतरल्याचे मनोहारी दृश्य मनाला ताजेतवाने आणि प्रसन्न करत होते.पंचवटीतील कपालेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने रीतीप्रमाणे पारंपरिक पालखी मिरवणूक सोमवार (दि.३१) काढण्यात आली. आकर्षक रांगोळी काढून आणि वाद्यांच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आले.
वैद्य कुटुंबीयांकडे वंशपरंपरेने जतन करण्यात आलेल्या पंचमुखी महादेवाचा मुखवटा हा तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्ताने दर्शनार्थ खुला करण्यात आल्याने भाविकांना मुखवट्याचे दर्शन घेता आले. सायं. ४ वाजता पालखी सोहळ्यास प्रारंभझाला, तर नगरप्रदक्षिणा झाल्यावर सायंकाळी ७ वाजता हर्ष वैद्य यांच्या हस्ते पंचमुखी रामतीर्थावर रुद्र, दुग्धाभिषेकाने महादेवाची विधिवत पूजा करून पंचामृताने पंचमुखी महादेवाच्या मुखवट्याचे पूजन करून विशेष महापूजा व महाआरती झाली.
१३३ वर्षांची अखंड परंपरा
कपालेश्वर पालखी सोहळ्याला तब्बल १३३ वर्षांची अखंड परंपरा असून, स्व. दादा उमाशंकर वैद्य यांनी ६ नोव्हेंबर १८९२ रोजी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर बी. कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली होती. तेव्हापासून वैद्य कुटुंबीयांनी ही धार्मिक परंपरा अखंडपणे जपलेली आहे. सध्या सुहास वैद्य, हर्ष वैद्य, मनोज वैद्य यांच्यासह कुटुंबातील सदस्य ही जबाबदारी सांभाळत आहेत.
पालखी सोहळ्याचा उत्साह
आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या पालखीचे मंदिरातून प्रस्थान झाल्यावर पालखी कपालेश्वर मंदिरातून मालवीय चौक, शनी चौक, राम मंदिर पूर्व दरवाजा, सरदार चौक, पुढे गद्दी आणि पुन्हा शनी चौक मार्गे रामतीर्थावर आणण्यात आली. त्यानंतर कपालेश्वर मंदिरात पालखी आणल्यानंतर रात्री १२ वाजता मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर मंगळवारी (दि.१) सकाळी पूजा करण्यात



