“दहशतवादाच्या संपूर्ण परिसंस्थेचा नायनाट करावा लागेल”, पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर मोदींचा SCO परिषदेत थेट इशारा

सर्व प्रकारचे तणाव आणि युद्धे रणांगणावर नव्हे, तर संवादाच्या माध्यमातूनच सोडवली जाऊ शकतात, असं म्हणत दहशतवादासाठी होणारा अर्थपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने या संपूर्ण परिसंस्थेचा आपल्याला नायनाट करावा लागेल, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानमधील शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत केलं.
यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफही उपस्थित होते.
दहशतवादासाठी असलेला परिसंस्थेचा नायनाट करावा लागेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘दहशतवाद आजही संपूर्ण मानवतेसमोरील एक गंभीर आव्हान आहे. त्याविरोधातील लढाई केवळ ‘कृती आणि प्रतिक्रिये’च्या चौकटीपुरती मर्यादित ठेवता येणार नाही. दहशतवादासाठी होणारा अर्थपुरवठा, भरती, कट्टरतावाद आणि सुरक्षित आश्रयस्थाने या संपूर्ण परिसंस्थेचा आपल्याला नायनाट करावा लागेल. या गंभीर विषयावर दुहेरी निकषांना कोणतंही स्थान असू शकत नाही, हे आपल्याला एकमुखाने स्पष्ट करावं लागेल.’
दहशतवाद कोणासाठीही साधन ठरत नाही
‘जे देश दहशतवादाचा वापर आपल्या धोरणाचं साधन म्हणून करतात, तसंच दहशतवाद्यांना आश्रय आणि पाठिंबा देतात, त्यांना कठोर संदेश देणं आवश्यक आहे की, दहशतवाद कोणासाठीही सामरिक साधन ठरू शकत नाही. शांत आणि सुरक्षित युरेशियाची आपली सामायिक आकांक्षा अफगाणिस्तानमधील शांतता आणि स्थैर्याशीही जोडलेली आहे. भारत अफगाणिस्तानच्या जनतेच्या विकासासाठी आणि मानवतावादी मदतीसाठी योगदान देत आला आहे आणि यापुढेही देत राहील’, असंही मोदी म्हणाले.
युद्ध रणांगणावर नव्हे, तर संवादाच्या माध्यमातून सोडवुया
‘आजच्या परस्परांशी जोडलेल्या जगात सुरक्षेची व्याप्ती आणखी व्यापक झाली आहे. पश्चिम आशियातील संकटाने हे दाखवून दिलं आहे की, एखाद्या एका क्षेत्रातील संघर्ष केवळ त्याच क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही. त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या ऊर्जा सुरक्षेवर, सागरी व्यापारावर आणि पुरवठा साखळीवर होतो. याचा सर्वाधिक फटका ग्लोबल साऊथमधील देशांना सहन करावा लागतो. त्यामुळे भारत सातत्याने हे आवाहन करत आला आहे की, सर्व प्रकारचे तणाव आणि युद्धे रणांगणावर नव्हे, तर संवादाच्या माध्यमातूनच सोडवली जाऊ शकतात’, असं मोदींनी स्पष्ट केलं.



