अंतराळात आहे एक अशी जागा जिथं वाहतात LPG च्या नद्या; थेट Titan शी संबंध? नासाच्या हाती घबाड…

पृथ्वी हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे, जिथं मानवी अस्तित्वं आणि सजीवसृष्टीचं वास्तव्य आहे. अशा या सूर्यमालेमध्ये पृथ्वीशिवाय इतर कोणता असा ग्रह किंवा ठिकाण आहे, जिथं मानवी अस्तित्वासाठी पूरक स्थिती आहे, याचच अध्ययन मागील कैक वर्षे अंतराळ संशोधन संस्था करत आहेत.
याच संशोधनाला आता मोठं यश मिळालं असून, एक असं ठिकाण सापडलं आहे जिथं चक्क एलपीजी आणि नैसर्गिक वायूच्या नद्या वाहतात. मिथेनचा पाऊस पडतो. विश्वास बसत नाहीये? नासा (NASA)च्या एका अतिशय महत्वाच्या निरीक्षणामध्ये याबाबतचा खुलासा झाला असून, भविष्यात शनिचा सर्वात मोठा चंद्र, ‘टायटन’ (Titan) भविष्यात मानवी वस्तीसाठीचं एक मुख्य ठिकाण ठरु शकतो. संशोधकांनी या ठिकाणाला फारसची खाडी (Persian Gulf of Space), असं नाव दिलं आहे. तिथं असणारं हायड्रोकार्बन, पाण्याचे भांडार पाहता या ठिकाणाला वरील नाव देण्यात आलं असून या नैसर्गिक स्त्रोतांचा फायदा संपूर्ण सौरमालेला होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरच्या खगोलशास्त्रज्ञ कॉनोर ए. निक्सन यांच्या नेतृत्त्वाखाली हे अध्ययन करण्यात आलं. ज्यामध्ये टायटनच्या संसाधनांचं सखोल विश्लेषण करण्यात आलं. टायटन या सौरमालेतील एकमेव असा चंद्र असून, त्याच्याकडे अधिक घनकेचं वातावरण आणि पृष्ठावर द्रवाचे पदार्थांच्या नद्या, तलावही आहेत. मात्र पृथ्वीपेक्षा पूर्ण उलट परिस्थिती या ठिकाणच्या समुद्रात पाहायला मिळते, कारण तिथं समुद्रात पाणी नव्हे तर द्रवरुपात मिथेन आणि इथेन वाहतो. टायटनच्या वातावरणात 5 टक्के भाग मिथेन वायूचा असून, या मिथेनचा वापर रॉकेटचं इंधन अर्थात रॉकेट प्रोपेलंट म्हणून केला गेल्यास अंतराळयानांच्या इंधनाचा प्रश्नही मिटू शकेल.
नव्या अहवालामुळं टायटन फक्त एक इंधन स्थानक म्हणूनच नव्हे, तर आत्मनिर्भर औद्योगिक केंद्र (Industrial Outpost) म्हणून अधोरेखित होतं. टायटनवर असणारे हायड्रोकार्बनवर प्रक्रिया करून अतिशय सोप्या पद्धतीनं प्लास्टीक, सिंथेटीक मटेरियल, सॉल्वेंट आणि कारखान्यांमध्ये वापरलं जाणारी रसायनं बनवता येतील. भविष्यात अंतराळ मोहिमांसाठी याचा वापर होण्यासमवेत शेती आणि अद्दयावत 3डी प्रिंटींगसाठीसुद्धा याचा वापर होऊ शकतो. ज्यामुळं अवकाशात सतत पृथ्वीवरून रसद पुरवण्याची गरजसुद्धा भासणार नाही.
शनिच्या कक्षेत असल्यामुळं टायटन अतिशय महत्त्वाचा आहे. भविष्यात जी अंतराळयानं यूरेनस (अरुण), नेप्च्यून (वरुण) किंवा सूर्यमालेतील अगदी अखेरच्या टोकापर्यंत केले तरीही टायटन एका पुरवठा केंद्राच्या भूमिकेत काम करत राहील. प्रत्यक्षात टायटनवर संसाधनाचा तुटवडा नसला तरीही, तिथं मानवी मोहिमा पोहोचणं मात्र आव्हानात्मक आहे. पृथ्वीपासून तो साधारण 1.4 अब्ज किमी इतका दूर असून, तिथं पोहोचण्यास कैक महिने किंवा वर्षही जाऊ शकतात. याशिवाय टायटनच्या पृष्टावरील तापमानाचा आकडा उणे 179 अंश असल्यानं इथं यंत्रणा आणि मानवी शरीर क्षणात गोठण्यास सुरुवात होईल, ही बाब नाकारता येत नाही.
खरंच इथं मानवी वस्ती होणं शक्यंय?
मानवी वस्तीसाठी पूरक वातावरणनाचा आढावा घेतला जात असतानाच शनिचा चंद्रस असणाऱ्या टायटनला आणखी जवळून जाणून घेण्याची आवश्यकता आहे. ज्यासाठी येत्या काळात नासा ‘ड्रॅगनफ्लाय’ ही मोहिम लाँच करत आहे. ज्यामध्ये आण्विक उर्जेवर चालणारं रोटरक्राफ्ट (हेलिकॉप्टरसारखा ड्रोन) टायटनच्या पृष्ठावर उतरवला जाणार असून, तेथील खगोलीय रचना आणि रसायनशास्त्राचं निरीक्षण कलं जाईल. त्यातून येणारे निष्कर्ष एका नव्या पर्वाला दिशा देतील असं म्हणायला हरकत नाही.



