मामीशी नजर भिडली अन् मोठा प्लान ठरला, मामाला पाण्यात ढकलताना. काय घडलं तळ्याकाठी?; सोलापुरात का होतेय मामा-भाच्यांची …

अनैतिक संबंध फारसे टिकत नाहीत. त्याचा कधी ना कधी पर्दाफाश होतोच. कुणी कितीही हे संबंध लपवण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी प्रकरण उजागर होतंच. कधी कधी तर प्रेमसंबंधातून इतरांच्या काटा काढण्यासाठी गेलेल्यांचाच काटा निघतो.
सर्व प्रकरण अंगाशी येते. सोलापुरातही असंच काही तरी घडलं. भाच्याची मामीशी नजर भिडली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. मग भाच्याने मामाचा काटा काढण्याचा प्लान रचला. प्लान एकदम जबरदस्त होता. या प्लाननंतर आपण मामीसोबत लग्न करून सुखी संसार थाटू असं भाच्याला वाटू लागलं. पण या प्लानमुळे आपणच या जगात राहणार नाही हे त्याला कुठे माहीत होतं? असं काय घडलं सोलापुरात?
बार्शी तालुक्यातील महागाव तलावात मामा आणि भाच्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालं. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं. पण हा घातपात तर नाही ना? याची पोलिसांना शंका आली. पोलिसांनी त्या दिशेने तपासही सुरू केला आणि जी धक्कादायक घटना समोर आली त्याने पोलीस हादरून गेले. भाच्याचं मामीवर प्रेम होतं. दोघांचेही संबंध सुरू होते. मामा प्रेमसंबंधात अडसर होता. तर मामीला मामाकडून सातत्याने मारहाण सुरू होती. त्यामुळेच भाच्याने मामाचा काटा काढण्याचा प्लान रचला होता.
पडताना मामाने…
प्लाननुसार मामा आणि भाच्याने भरपूर दारू घेतली. दोघेही महागाव तलावाजवळ आले. तिथेही दारू प्यायल्याचं समजतं. मामा नशेत तर्रर होता. त्याला चढली होती. त्यामुळे भाच्याने मामाला तलावात ढकलण्याचा प्रयत्न केला. मामा तलावात पडलाही, पण पडताना त्याने भाच्यालाही तलावात ओढलं. तलावाचं पाणी खोल होतं. दोघांनाही पोहायला येत नव्हतं. त्यामुळे दोघांचाही तलावत बुडून मृत्यू झाला.
मामी अखेर बोलली
भाच्याचं नाव गणेश सपाटे आहे. तर मामाचं नाव शंकर पटाडे आहेत. दोघेही 19 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. गणेश सपाटेचा मोबाईल दोन दिवसांपासून बंद होता. त्यामुळे त्यांचा सर्वत्र शोध घेतला जात होता. दोघेही सापडत नव्हतं. दोन दिवसानंतर दोघांचेही मृतदेह तलावात तरंगताना दिसले. गावकऱ्यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाला पाठवला.
याबाबत पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. तेव्हा कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता वर्तवली. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे अधिकच फिरवली. या प्रकरणी पोलिसांनी मामी रुपाली राठोड हिचीही चौकशी केली. त्यावेळी तिने संपूर्ण गुन्ह्याची कबुली देत अख्खा प्लानच पोलिसांसमोर मांडला. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली असून तिला 27 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.