Navgan News

राष्ट्रीय

दिल्लीतील प्रजासत्ताक सोहळ्याला आदिवासी राजाला निमंत्रण; कोण आहेत?


प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला आदिवासी राजा रमण राजमन्नन आणि त्यांची पत्नी बिनुमोल या सहभागी होणार आहेत. अनेकांना या राजघराण्याबाबत माहिती नसेल.

हा राजा केरळ राज्यातील आहे.

अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री ओ.आर. केलू यांनी याची माहिती दिली आहे. रमण हे केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील कांचियार कोविलमाला येथ राहत आहेत. ते ४८ अनुसुचित जमातींच्या गावांचे राजे आहेत. या गावांत ३०० हून अधिक मन्नान कुटुंबीय आहेत. त्यांच्या परंपरेत राजाला महत्वाचे स्थान आहे. मातृवंशीय वारसा पद्धतीनुसार राजघराण्यांमधून राजा निवडला जातो.

 

सध्याच्या काळात या राजाचे सैन्य नसले तरी दोन मंत्री दिमतीला असतात. काही सैनिकही असतात. सार्वजनिक कार्यक्रमांना जाताना राजा आणि त्याचे मंत्री पारंपरिक थलापाव पोषाख परिधान करतात. त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च हा अनुसूचित जमाती विकास विभागाकडून केला जाणार आहे. परेडनंतर ते दिल्लीतील विविध ठिकाणांना भेटी देतील आणि २ फेब्रुवारीला आपल्या राज्यात परतणार आहेत.

 

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो असणार आहेत. आपला देश दरवर्षी विविध देशाच्या नेत्यांना निमंत्रित करतो. सुबियांतो हे जगातील सर्वात मोठ्या मुस्लिम देशाचे प्रमुख आहेत. काही दिवसांपू्र्वी ते भारताचा दौरा आटोपून पाकिस्तानला भेट देणार असल्याचे दावे पाकिस्तानी मिडीयाने केले होते. यामुळे त्यांच्या भारतात येण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

गेल्या वर्षी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यापूर्वी २०२३ मध्ये इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी हे प्रमुख पाहुणे होते.

 

भारत २६ जानेवारी २०२५ रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशभरात प्रजासत्ताक दिन साजरा केला जाईल. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाची परेड आकर्षणाचे केंद्र असेल. सकाळी १०:३० वाजता परेड सुरू होणार आहे. ही परेड विजय चौकातून सुरू होईल आणि कर्तव्य पथ मार्गे लाल किल्ल्यावर जाणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *