
तिलक वर्मानं केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर भारतीय संघानं चेपॉकचं मैदानही मारलं. इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तिलक वर्मानं मॅच विनिंग खेळी करताना ७२ धावांची नाबाद खेळी केली.
या खेळीसह त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर तो एकाही मॅचमध्ये आउट झालेला नाही. नाबाद राहून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केलाय.
तिलक वर्मानं साधला विश्व विक्रमी डाव
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्याआधीच्या तिन्ही सामन्यात तिलक वर्मा नाबाद राहिल्याचे पाहायला मिळाले होते. यात त्याने १९*, १२०* आणि १०७* धावांची खेळी केली होती. यात आता चेन्नईच्या मैदानातील इंग्लंड विरुद्धच्या ७२ धावांच्या नाबाद खेळीची भर पडली आहे. यासह तिलकने चार सामन्यात नाबाद राहून सर्वाधिक ३१८ धावा करण्याचा पराक्रम करून दाखवला. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.
याआधी कुणाच्या नावे आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वाधिक नाबाद धावा करण्याचा रेकॉर्ड?
याआधी टी-२० क्रिकेटमध्ये नाबाद राहून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा न्यूझीलंडच्या मार्क चॅपमन या फलंदाजाच्या नावे होता. त्याने नाबाद २७१ धावा केल्या होत्या. याशिवाय या यादीत श्रेयस अय्यर (२४०) आणि एरोन फिंच (२४०) यांचाही समावेश आहे. तिलक वर्मा अजूनही नाबाद आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याला नाबाद सर्वाधिक धावा करण्याचा आपला विक्रम आणखी भक्कम करण्याची संधी आहे.