पहिल्या जागतिक महायुद्धात 80 लाख घोड्यांचा मृत्यू,उपाशी सैनिकांनी खाल्ले मृत घोड्यांचे मांस…
पहिले जागतिक महायुद्ध जमिनीवर लढले गेले. पहिल्या महायुद्धात तब्बल 80 लाख घोड्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. बहुतांश घोडे हे जखमी होऊन उपचारांअभावी मरण पावले, त्यामुळे त्यांना युद्धभूमीवरच गाडले गेले.
या युद्धात भारतीय वंशाच्या काठेवाड आणि मारवाड घोड्यांनी अतुलनीय शौर्य गाजवलेे आहे. अस्सल भारतीय घोड्यांच्या प्रजाती नामशेष कशा झाल्या, यावर पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये विशेष संशोधन सुरू आहे.
जगातील सर्वात भीषण महायुद्ध म्हणून पहिल्या जागतिक महायुद्धाची नोंद घेतली गेली. कारण, या युद्धात तब्बल 1 कोटी सैनिकांसह सुमारे 2 कोटी सामान्य नागरिक मारले गेले. तसेच युद्धात सहभागी झालेले तब्बल 80 लाख घोडे मारले गेले. या युद्धात भारतातील काठेवाड आणि मारवाड प्रांतातील मारवाड या देशी घोड्यांचा वापर इंग्रजांनी केला. जगातील सर्वच प्रजातींचे घोडे या युद्धात होते; मात्र भारतीय वंशाच्या घोड्यांची तग धरून राहण्याची क्षमता सर्वात चांगली होती, असे संशोधनाअंती समोर आले आहे.
प्रचंड मालमत्तेची हानी झालेले युद्ध
बोस्नियाची राजधानी सॅराजेन्होे येथे एका सर्बियन माथेफिरूने 28 जून 1914 रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीचा राजपुत्र आर्चडयुक फर्डिनांड याची हत्या केली. हेच पहिल्या महायुद्धाचे कारण ठरले.
ऑस्ट्रिया-हंगेरीने जर्मनीच्या पाठिंब्याच्या जोरावर सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. बाल्कन प्रदेशात सुरू झालेले युद्ध वणवा पसरवा तसे युरोपात पसरले. 28 जुलै 1914 रोजी सुरू झालेले हे युद्ध सुमारे चार वर्षांनी म्हणजे 11 नोव्हेंबर 1918 रोजी संपले. या युद्धात दोन्ही बाजूंनी 7 कोटी सैनिक सहभागी झाले होते. सुमारे 1 कोटी सैनिक आणि 1.6 ते 2 कोटी नागरिकांना जीव गमवावा लागला. मालमत्तेची प्रचंड हानी झाली. रणगाडे, रासायनिक शस्त्रांचा वापर ही या युद्धाची वैशिष्ट्ये ठरली.
युद्धासाठी जगभरातून 1 कोटी घोड्यांची आयात
प्राण गमावलेल्या अंदाजे एक कोटी सैनिकांचे बलिदान सर्वांना ज्ञात आहे. मात्र, या मोठ्या युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सुमारे 80 लाख घोड्यांनी दिलेले बलिदान फार कमी लोकांना माहीत आहे. या युद्धात घोड्यांनी बजावलेल्या देदीप्यमान कामगिरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पहिल्या महायुद्धात यांत्रिक वाहने कमी असल्याने सैनिकांच्या वाहतुकीसाठी, घोडदळासाठी, रसद पुरवण्यासाठी, दारूगोळा, औषधे, अवजड युद्ध साहित्य वाहून नेण्यासाठी घोड्यांचा वापर केला गेला. यासाठी जगाच्या विविध भागांतून 1 कोटी घोड्यांची आयात करण्यात आली. एकट्या ब्रिटनने सुमारे 10 लाख घोडे आयात केले होते. हे घोडे प्रामुख्याने उत्तर अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका इथून मागवण्यात आले होते.
घोड्यांनी सैनिकांना दिला मानसिक आधार
संशोधकांनी खूप वेगळ्या बाबी शोधून काढल्या आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार, या युद्धात रुग्णवाहिका जखमी सैनिकांचे प्राण वाचविण्यासाठी वरदान ठरल्या. दीर्घकाळ आपल्या कुटुंबीयांपासून दूर युद्धभूमीवर राहिल्याने सैनिकांची मानसिकता बिघडू लागली होती; पण घोड्यांनी निष्ठावान, विश्वासू सहकार्याप्रमाणे त्यांना साथ दिली. घोड्यांमुळे निर्माण झालेल्या मैत्रिबंधाने सैनिकांना मानसिक आधार मिळाला.
‘त्या’ घोड्याला सर्वोच्च बहुमान!
पहिले महायुद्ध हे घोड्यांनी मानवजातीसाठी दिलेल्या अतुल्य बलिदानचे असामान्य उदाहरण म्हणून लक्षात ठेवावे लागेल. या सर्व हानीत ‘वॉरियर’ घोडा मात्र नशीबवान ठरला. 1908 साली जन्मलेला हा घोडा आपले मालक जनरल जॅक सीली यांच्यासोबत ऑगस्ट 1914 मध्ये युद्धआघाडीवर आला. मशिनगन्स, तोफगोळे, चिखलाने भरलेला भूभाग, उपासमार या सर्व संकटांना तोंड देऊन या घोड्याने आपले कर्तव्य चोखपणे बजावले. वॉरियर हॉर्सची युद्धभूमीवरील ही कामगिरी मनोधैर्य खचलेल्या सैनिकांसाठी प्रेरणादायी ठरली. हा घोडा डिसेंबर 1918 साली ब्रिटनला सुखरूप परतला. 2014 साली वॉरियर हॉर्सला मरणोप्रांत ‘डिकीन मेडल’ हा प्राण्यांसाठी असलेला सर्वोच्च शौर्य पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
पहिल्या महायुद्धातील घोड्यांच्या इतक्या प्रचंड हानीमुळे युद्धनीती पुढे यांत्रिकीकरणाकडे झुकली. घोड्यांचा वापर प्रचंड कमी झाला. युद्धभूमीवर बलिदान देणार्या घोड्यांची स्मारके अनेक देशांत उभारली गेली.
डेक्कन संस्थेत 50 हजार वर्षांतील घोड्यांच्या वंशावळीचा अभ्यास
गत 50 हजार वर्षांतील घोड्यांच्या वंशावळीवर पुण्यातील डेक्कन कॉलेजचा अभ्यास सुरू असून, तो आता अंतिम टप्प्यात आहे. नर्मदा खोर्यात सापडलेल्या घोड्यांच्या हाडांमुळे हे संशोधन सुरू झाले आहे. इंडिजीनस हॉर्स सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय पुरातत्त्व विभाग आणि पुण्यातील डेक्कन कॉलेजचे शास्त्रज्ञ व संशोधक विद्यार्थी अशा तीन संस्था मिळून हा अभ्यास करत आहेत. नर्मदा नदीच्या पात्रात सापडलेली देशी घोड्यांची हाडे आणि सध्या अस्तित्वात असलेल्या घोड्यांच्या हाडांवर (हिस्टोमॉर्फोमेट्रिक) शास्त्रीय पद्धतीने हा अभ्यास सुरू आहे. भारतीय जंगली घोडा नेमका कसा होता, तो का गायब झाला, याचा शोध यातून घेतला जाणार आहे.
मारवाड, काठेवाड, महाराष्ट्रीय घोड्यांवर संशोधन
भारतात मारवाड, काठेवाड या जातीचे राजस्थानातील घोडे खूप मजबूत होते. तसेच महाराष्ट्रातील पहाडी भागातून आणलेले लढाईत वापरले गेलेले घोडे यांचे वंश ब्रिटिश काळात नेमके कुठे गेले, याचाही अभ्यास यात केला जात आहे. भारतीय देशी आणि युरोपियन, अमेरिकन व ब्रिटिश घोड्यांची हाडे, दात आणि खुर यांचा आधार घेऊन हा अभ्यास सुरू आहे. डेक्कन कॉलेजमधील पुराजीवाश्मशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. विजय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक सहायक डॉ. प्रतीक चक्रवर्ती यांच्यासह संशोधक विद्यार्थी देवदत्त पोखरकर आणि बेंजामिन खोंगवीर हे भारतीय घोड्यांच्या विविध प्रजातींच्या इतिहासावर संशोधन करत आहेत.
भारतीय वंशाच्या घोड्यांची कमाल
पहिल्या महायुद्धात काठेवाड आणि मारवाड या भारतातील स्थानिक प्रजातींच्या घोड्यांचा उपयोग करण्यात आला. हे घोडे त्यांची निष्ठा, नैसर्गिक धैर्य आणि सहनशीलता यासाठी प्रसिद्ध आहेत. प्रतिकूल हवामानात व आव्हानात्मक परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता, कमीत कमी देखभालीची गरज, चपळाई यामुळे काठेवाड आणि मारवाड घोडे कठीण भूप्रदेशात युद्धाच्या परिस्थितीत विश्वासार्ह ठरले.
उपाशी सैनिकांनी खाल्ले मृत घोड्यांचे मांस
उपासमारीने त्रस्त झालेल्या सैनिकांनी मृत घोड्यांच्या मांसाचा अन्न म्हणून वापर केला. स्थानिक जनतेने मेलेल्या घोड्यांचे चामडे, हाडे विविध कारणांसाठी वापरले. घोड्यांचे अवशेष शेतात खत म्हणूनदेखील वापरले गेले. जखमी झालेल्या घोड्यांना वाचवण्याची शर्थ पशुवैद्यकीय पथकांनी केली. त्यांना रुग्णवाहिका पुरवणे शक्य नसल्याने मरणासन्न घोड्यांना वेदनारहित मृत्यू देण्यात आला.
मशिनगन्स, बंदुकांनी घेतले घोड्यांचे प्राण
युद्धात जलदगतीने आक्रमण करण्यासाठी घोडदळाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. परंतु, मशिनगन्स, तोफा, बंदुका यांचाही वापर मोठ्या प्रमाणात झाल्याने लाखो घोडे मृत्युमुखी पडले. घोड्यांनी खरी कामगिरी बजावली ती अवघड, बिकट, चिखलाने व्यापलेल्या भागातून जाताना. घोड्यांमुळे रसद, दारूगोळा, औषधे यांची रसद वेगाने मिळाली; पण ते करताना त्यांना प्राण गमवावे लागले.
80 लाख घोड्यांचा हाल हाल झाल्याने मृत्यू
सुमारे 80 लाख घोड्यांना युद्धभूमीवर गोळीबार, तोफांचा मारा सहन करावा लागला. त्यात त्यांच्यावर उपासमार, रोगराई, हालअपेष्टाची वेळ आली, यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश घोड्यांना युद्धभूमीवर सामूहिकरीत्या दफन करण्यात आले.