मधुमेह म्हणजेच डायबिटीस. गेल्या काही वर्षापर्यंत अनुवंशिक आजार म्हणून हा रोग ओळखला जायचा. मात्र आता या आजाराचं रूपांतर लाईफस्टाईल डिसीजमध्ये झालं असून या आजाराने अनेकांना मगरमिठी मारली आहे.
असं म्हणतात की डायबिटीसची गोळी एकदा सुरू झाली की ती मरेपर्यंत घ्यावी लागते. सध्या अनेक तरूणांना टाईप 2 डायबिटीस झाल्याचं दिसून येतं. अनेकांनी डाएट आणि व्यायामाच्या माध्यमातून या आजाराला परतवून लावलंय. टाईप 2 डायबिटीस असणाऱ्या मधुमेही रूग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आत्तापर्यंत जांभूळ हे फळ किंवा जांभळ्याच्या फळांची पावडर डायबिटीसवर गुणकारी मानली जात होती. मात्र आता डायबिटीसच्या रूग्णांसाठी आणखी एक ‘बी’ वरदान ठरणार आहे. गुवाहाटीतल्या इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IAST) च्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, सुबाभुळाच्या बिया डायबिटीसवर गुणकारी आहेत.
सुबाभूळ कुठे आढळते ?
अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असलेली सुबाभूळ ही औषधी वनस्पती उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात आढळून येते. सुबाभुळाची पानं आणि कच्च्या बिया सूप आणि सॅलड्समध्ये वापरल्या जातात. सुबाभुळात भरपूर प्रथिनं आणि फायबर्स असतात. आत्तापर्यंत तरी सुबाभुळाच्या बियांचा वापर हा जनावराचं खाद्य म्हणून अधिक प्रमाणात होतो. मात्र सुबाभुळात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे कॅन्सरसारख्या आजारांना दूर ठेवू शकतात. त्यामुळे सुबाभुळाच्या बिया या मानवासाठी खाणं फायदेशीर आहे.
सुबाभुळचा इन्सुलिनला कसा फायदा होतो?
आपल्याला माहिती आहे की, शरीरातलं इन्सुलिन हे रक्तातली साखरेची पातळी कमी करते. त्यामुळे जोपर्यंत रक्तात योग्य प्रमाणात इन्सुलिन मिसळत राहतं तोपर्यंत डायबिटीसचा त्रास होत नाही. मात्र इन्सुलिनचं प्रमाण कमी होऊ लागलं की रक्तातल्या साखरेची पातळी वाढू लागते. गुवाहटीच्या शास्त्रज्ञांनी सुबाभूळ बियांचा अभ्यास केला. त्यात त्यांना असं आढळून आले की या बिया खाल्ल्यामुळे शरीरातलं इन्सुलिन वाढायला मदत होते. त्यामुळे आपसूकच रक्तातली साखर नियंत्रणात येते.
आशेचा किरण
सुबाभुळाच्या बिया खाल्ल्यामुळे फक्त इन्सुलिनचं प्रमाण वाढून फक्त साखर नियंत्रणात येत नाही तर या बियांमुळे पेशींमध्ये ग्लुकोजचे शोषून घेण्याचं प्रमाण वाढतं, जे टाइप 2 प्रकारातल्या डायबिटीसवर गुणकारी आहे. मधुमेह आणि अन्य काही आजारांसदर्भांत इतर उपचारांसाठी सुबाभूळ एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो. ज्यामुळे कमी खर्चात आणि कोणत्याही रसायनांच्या वापरायाशिवाय डायबिटीस नियंत्रणात आणणं शक्य होऊ शकतं.