लंडन : माकडापासून उत्क्रांती होत आजचा आधुनिक माणूस विकसित झाला, असे डार्विनचा सिद्धांत सांगतो. अर्थात ही उत्क्रांतीची प्रक्रिया अद्याप सुरूच असल्याचेही काही संशोधकांचे म्हणणे असते.
याच प्रक्रियेत भविष्यकाळात माणसाला चोचही येऊ शकते, असा दावा एका वैज्ञानिकाने केलेला आहे! आधुनिक आहारशैली, मानवी दातांची सध्याची रचना व वयस्कर लोकांची वाढती संख्या यामुळे आगामी काळातील उत्क्रांती प्रक्रियेत माणसाला चोच असण्याची शक्यता आहे असा हा दावा आहे. हा दावा तसा नवा वाटत असला, तरी ‘मोठी चोच सिद्धांत’ पूर्वीपासून प्रचलित आहे.
टूथ फेअरी सेल्स व चोचीची उत्क्रांती या दोन्ही विषयांवर संशोधन
शेफील्ड विद्यापीठातील संशोधकांनी आताच्या समस्यांवर आधारित असलेला उत्क्रांती सिद्धांत मांडलेला असून, त्यांच्या मते या समस्यांवर मात करण्याच्या हेतूने आपोआप काही बदल माणसात घडून येतील. मानवात त्याच्या जीवनकालात त्याला दातांचे दोनच संच उपलब्ध होतात व आता तर आयुष्यमान वाढत चालले आहे त्यामुळे वृद्धांना सध्याचे दात व त्यांची उपलब्धता पुरेशी नाही, आहारातही बदल होत आहेत त्यामुळे दातांऐवजी चोच किंवा इतर काही प्राण्यांप्रमाणे दातांचे दोन पेक्षा जास्त संच हे बदल घडून येण्याची शक्यता आहे. माणसांना दंतरोग तज्ज्ञांना टाळायचे असेल, तर त्यांना चोच सोयीस्कर असेल! पफरफिशमध्ये गेली लाखो वर्षे उत्क्रांती होऊन शेवटी चोच निर्माण झाली. पफरफिश या चोचीचा उपयोग गोगलगायींचे शंख, खेकड्यांना फोडण्यासाठी करू लागले. चोची या अतिशय दणकट व अनुकूल असतात, असा दावा प्रमुख संशोधक गॅरेथ फ्रेझर यांनी केलेला आहे. आणखी एका सिद्धांतानुसार आगामी काळात मनुष्यात आपले दात सतत बदलत राहण्याची एक अंगभूत क्षमता निर्माण होईल. शार्क माशाचे दात त्याच्या आयुष्यकाळात सतत पडतात व पुन्हा येतात तसे घडून येईल. या शार्क माशाचे दात हिरड्यात बसवलेले असतात; पण जबडड्याच्या हाडात पक्के केलेले नसतात, ते कन्व्हेयर बेल्टसारख्या पद्धतीने चालतात ते मागच्या बाजूला परिपक्व होऊन हळूहळू पुढे येतात व बाकीचे दात पडतात. ज्या पेशींमुळे नवीन दात विकसित होतात व वाढतात त्याला प्युटेटिव्ह स्टेम सेल (मूलपेशी) म्हणतात त्यांना टूथ फेअरी सेल्स असेही वैज्ञानिक गंमतीने म्हणतात. आगामी पिढ्यांमध्ये या टूथ फेअरी सेल्स नेहमी दात तयार करीत राहतील. शार्क माशांमध्ये सतत दात पुन्हा पुन्हा येत राहतात ती क्षमता माणसात येऊ शकते, असे फ्रेझर यांचे मत आहे. हे सगळे बदल अगदी लगेच घडून येणार नाहीत, वैज्ञानिक सध्या टूथ फेअरी सेल्स व चोचीची उत्क्रांती या दोन्ही विषयांवर संशोधन करीत आहेत.