छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यासंपादकीय

गांभीर्य हवा प्रदूषणाचे… भाग ५. प्रदूषकांचे मानवी आरोग्यावर घातक व विपरीत परिणाम


 

हवा प्रदूषणाचा घटक असलेल्या अनेक प्रदूषकांचे मानवी आरोग्यावर घातक व विपरीत परिणाम होतात. गंधकाची प्रणिले (सल्फरचे ऑक्साईड्स) जर अधिक प्रमाणात हवेमध्ये असतील तर श्वसनाचे विकार जडतात. हृदय व फुपुसांच्या व्याधीही निर्माण होतात, दृष्टी कमजोर बोलू लागते. पर्यावरणावर देखील अनेक परिणाम होतात. गंधक प्रणीलांमुळे वनस्पतींना हरितलवकक्षय (क्लोरोसिस) नावाचा रोग होतो. म्हणजे, वनस्पतींच्या उती मृत पावू लागतात. त्यामुळे, प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत महत्त्वाचा असलेला घटक कमी होऊ लागतो. नत्रप्रणीलांचे (नायट्रोजन ऑक्साईडचे) प्रमाण वाढले तर हवेमध्ये पॅरॉक्सि ऍसिटायल नायट्रेट नावाचे संयुग तयार होते. त्याच्यामुळे मानवी शरीरावर श्वसनाचे विकार जडतात. जर पेरॉक्सि ऍसिटिक नायट्रेटचे (PAN) प्रमाण जास्त झाले तर, ते विषारी असल्यामुळे मानवी शरीरावर अन्य वाईट परिणाम देखील होतात. पर्यावरणात नत्रप्रणीलांचे (नायट्रोजन ऑक्साईडचे) प्रमाण वाढल्यास आम्लपर्जन्य होण्याची शक्यता असते. त्यामुळे, पिकांची उत्पादकता कमी होते. वातावरणातील हवा प्रदूषणात धूर, धूळ आणि धुके यांचे प्रमाण वाढल्यास फुफुसांच्या वायू शोषण-उत्सर्जन प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन श्वसन क्षमतेमध्ये घट होते. पर्यावरण दृश्यमानावर देखील त्याचा अनिष्ट परिणाम होतो. प्रकाश आंतरपरावर्तित करून धूळ, धूर व धूके हवामानाची दृश्यमानता कमी करते, ज्यामुळे अंधुक वातावरण निर्माण होऊन विविध वाहनांच्या अपघातास कारण ठरते. दृश्यमानता घटल्यामुळे अनेक परिणाम होत असतात. प्रदूषकांमध्ये सूक्ष्मकण तरंगत्या स्वरूपात अधिक असतील तरी त्यामुळेही श्वसनसंस्थेचे अनेक प्रकारचे विकार जडतात, दमा वाढू शकतो, फूपुसाचा दाह होतो, फुफुसाची कार्यक्षमता कमी होते, प्रसंगी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या सूक्ष्मकणांमुळे हाडांचे विकार देखील होऊ शकतात. हे कण कर्करोगाला निमंत्रण ठरू शकतात. जडधातूचे प्रमाण जर या सूक्ष्मकरणांमध्ये अधिक असेल तर विषारीपणामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. या कणांचे प्रमाण अधिक झाल्यास जैवविविधतेवरही वाईट परिणाम होतात. संवेदनशील व अतिसंवेदनशील वनस्पती नष्ट होऊ शकतात. विविध प्रकारच्या प्रकाश संश्लेषण करणाऱ्या हरित पानांवर काळा थर जमा होतो किंवा काजळी जमा होते आणि त्यामुळे वनस्पतींची वाढ कमी होऊन उत्पादकता देखील घटते. हवेत कर्ब एकप्रणिलांचे (कार्बन मोनॉक्साईडचे) प्रमाण जास्त झाल्यास त्याच्या शोषणाने चक्कर येऊन माणूस बेशुद्ध होऊ शकतो. हा कर्ब एकप्रणील (कार्बन मोनॉक्साईड) श्वसनाद्वारे प्राणवायूपेक्षा अधिक तत्परतेने शोषला जाऊन हिमोग्लोबिनशी संयोग पावतो व रक्तात प्राणवायूची कमतरता निर्माण करतो. त्यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते, प्राणवायूची उपलब्धता घटवितो, त्यामुळे, हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेचे अनेक विकार संभवतात. प्रामुख्याने, नवजात बालके, गरोदर स्त्रिया आणि वृद्ध स्त्री-पुरुष यांना यामुळे अधिक धोका निर्माण होतो. कर्ब एकप्रणील (कार्बन मोनॉक्साईड) व कर्ब द्वीप्रणिले हे वातावरणाचे तापमान वाढ घडविणारे प्रमुख घटक असल्यामुळे जागतिक तापमानात वाढ होण्यास सुद्धा कारणीभूत ठरतात. प्राणवायूत्रिप्रणील (ओझोन) हा देखील असाच प्रमुख वायू प्रदूषक आहे. वातावरणाच्या ३० ते 40 किमी उंचीवरील निलांबरांमधील ओझोनच्या थरामुळे सूर्याचे अतिनील किरण पृथ्वीवर येत नाहीत. पण भूपृष्ठाजवळील वातावरणाच्या थरात ओझोनचे प्रमाण वातावरणात श्वसन संस्थेचे विकार बळावतात, घशाचा त्रास सुरू होतो, दमा आणि फुफ्फुसाचे विकार बळावतात. छातीत कळ येणे, छाती दुखणे असे प्रकार होऊ लागतात. ओझोनचे प्रमाण जर वातावरणात अधिक झाले तर वनस्पतींच्या कार्यप्रणालीवर विपरीत परिणाम होतो. ओझोन मुळेच धुके तयार होण्यास मदत होते. ओझोन सुद्धा हरितगृह वायू असल्यामुळे जागतिक तापमान वाढीत महत्त्वाचे भूमिका बजावतो.

शीघ्रज्वलनासाठी पेट्रोलमध्ये क्नोकिंग एजंट म्हणून शिशांचा वापर केला जायचा, त्यामुळे पेट्रोल इंधन ज्वलनानंतर शिशाचे कण हवेत पसरत असत. पण आता त्याचा वापर कमी होत आहे. पेट्रोल मधील सिसे इंधन म्हणून वापरला तर पेट्रोल ज्वलनानंतर हवेत मिसळून तो जर श्वासनाद्वारे शोषला गेला तर रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेवर वाईट परिणाम करतो. वाहनांच्या इंधन ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या शिसे या धातूच्या कणांमुळे वातावरण धूसर आणि धूळयुक्त बनवण्यास मदत होते. औद्योगिक कारखान्यातून बाहेर पडणारा अमोनिया हा वायू देखील प्रमुख प्रदूषक आहे. या हवा प्रदूषकामुळे डोळ्याची जळजळ होते, नाक, घसा, श्वसन मार्ग आणि डोळे यांच्यावर अनिष्ट परिणाम होतो. जर हा परिणाम दीर्घकाळ होत राहिला तर प्रसंगी अंधत्व येण्याची शक्यता असते. या प्रदुषकामुळे फुफुसांना इजा होते. काही वेळा अमोनियाचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त असेल तर मृत्यू देखील संभवतो. अमोनिया हा घटक पर्जन्यवृष्टीच्या वेळी जलधारा बरोबर पाण्यात विरघळून जेव्हा जलाशयात मिसळतो, तेव्हा जलाशयाचे पाणी अम्ल्धार्मी बनते आणि त्यामुळे जलचरांवर त्याचा विपरीत परिणाम होतो.

प्रा.डॉ.बी.एल.चव्हाण,  पर्यावरणतज्ञ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *