रासायनिक घटकांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पादन खर्चामध्ये मोठी वाढ होत आहे. सेंद्रिय खतांचा वापर कमी होत गेल्यामुळे पिकांचे आरोग्य व त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाचाही दर्जाही कमी होत आहे. अशा वेळी पर्यावरणाचे भान राखणारी सेंद्रिय शेती (Organic Farming) करण्याकडे शेतकऱ्यांचाही कल वाढत आहे. या पद्धतीमुळे नैसर्गिक संतुलन राखले जाऊन माती, पाणी आणि हवेचे प्रदूषण टाळता येते. तसेच दीर्घकाळ व शाश्वत उत्पादन मिळू शकते.
सेंद्रिय खतांच्या उपलब्धतेसाठी पशुधनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पशुधनापासून मिळणाऱ्या शेण, मूत्र यापासून बायोगॅसही तयार करता येतो. त्यासाठी एखादे छोटे बायोगॅस सयंत्र अल्पभूधारक शेतकरीही उभे करू शकतात. त्यातून त्यांच्या घरगुती इंधनाची प्रश्न सुटतो. तसेच या बायोगॅस सयंत्रातून बाहेर पडणाऱ्या स्लरीचा वापर शेतामध्ये सेंद्रिय खत म्हणून उत्तम प्रकारे करता येतो.
कारण बायोगॅस सयंत्रामध्ये शेणखतावर सूक्ष्मजिवांमार्फत प्रक्रिया केली जाते. एकूण शेणापैकी सुमारे २५% शेणाचे रूपांतर हे वायुरूप इंधनामध्ये होते, तर उरलेल्या ७५% शेणाची स्लरी मिळते. या ‘बायोगॅस स्लरी’ मध्ये २% नत्र, १% स्फुरद व १% पालाश असते. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे यात पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अशी अनेक सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके आणि प्रेरक घटकही उपलब्ध असतात. या उत्तम गुणवत्तेच्या खतामध्ये कुजून गेल्यामुळे तणांच्या किंवा गवताच्या बिया शिल्लक राहत नाहीत.
ज्या शेतकऱ्यांकडे दोन जनावरे आहेत, त्यांनी एक घनमीटर आकाराचे बायोगॅस संयंत्र उभारावे. त्यातून मिळणाऱ्या खतांमधून १.५ ते २ एकर शेतातील खताची पूर्तता होऊ शकते. त्यातून मिळणाऱ्या बायोगॅसवर कुटुंबातील ४-५ सदस्यांच्या स्वयंपाकही होऊ शकतो.
दोन घनमीटर बायोगॅस सयंत्रासाठी प्रति दिन सुमारे ५० किलो शेण याप्रमाणे प्रति वर्षी १८.२५ टन शेण वापरले जाते. त्यातून ८०% ओलावा असलेली जवळपास १० टन बायोगॅस स्लरी मिळते. या ओल्या स्लरीमध्ये अमोनिअम नायट्रेटचे प्रमाण अधिक असते. या स्लरीचा त्वरित वापर केल्यास पिकांना रासायनिक खतासारखा त्वरित फायदा मिळू शकतो. यामुळे उत्पादनात १० ते २० टक्क्यांनी वाढ होते.
स्लरीच्या वापरामुळे जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
बायोगॅस स्लरीच्या शेतातील वापराचे फायदे ः
मातीमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
मातीच्या भौतिक गुणवत्तेमध्ये वाढ होते. जमिनीमध्ये हवा खेळती राहिल्यामुळे पिकांची मुळे चांगल्या प्रकारे अन्नद्रव्ये उचलू शकतात.
मातीच्या जैविक गुणवत्तेमध्ये देखील वाढ होते. शेतामध्ये स्लरीच्या वापरामुळे सेंद्रिय कर्बावर वाढणारे उपयुक्त जिवाणूंचेही प्रमाण वाढते. त्याचा फायदा पिकांना जमिनीतील अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसोबतच आरोग्यासाठीही होतो.
अजय गव्हांदे, ९९२२६६८९४७
(सहायक प्राध्यापक, नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद, जि. बुलडाणा.)
✍️✍️हे ही वाचा
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या