लखनौ : साहेब, माझी बायको विडी ओढते. त्यामुळे मला अॅलर्जी आहे, अनेक वेळा समजावूनही ती मान्य करत नाही. मला घटस्फोट मिळवून द्या, अशी विनवणी आहे एका नवऱ्याची. एसएसपी कार्यालयातील महिला कक्षात पोहोचलेल्या पतीने इन्स्पेक्टरसमोर आपली कैफियत मांडलीत्यावर पोलीस निरीक्षकांनी पत्नीला बोलावलं. तेव्हा, टेन्शन आल्यावर आपण विडी पित असल्याचं कारण बायकोने सांगितलं. ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले. अखेर लग्न वाचवण्यासाठी तिने भविष्यात बिडी न ओढण्याचे आश्वासन दिलं. उत्तर प्रदेशातील या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
काय आहे प्रकरण?
जहांगीराबाद कोतवाली परिसरात राहणारा संबंधित पती आठवडाभरापूर्वी एसएसपी कार्यालयात असलेल्या महिला कक्षात पोहोचला होता. तिथे त्याने महिला सेलच्या प्रभारींना तक्रार पत्र दिले आणि सांगितले की त्याच्या पत्नीला विडी ओढण्याचा शौक आहे. आपल्याला त्याची अॅलर्जी आहे. तिच्या विडीच्या व्यसनामुळे आपली समाजातील प्रतिष्ठाही धुळीला मिळाली आहे. याबाबत त्याने पत्नीला अनेकदा समजावून सांगितले. पण, ती तिची सवय सोडत नाही.
माहेरचं म्हणणंही ऐकेना
या प्रकरणी महिलेच्या माहेरहून तक्रारही करण्यात आली होती. मात्र, समजावूनही त्याची पत्नी तयार होत नव्हती. पतीने सांगितले की, त्याचे मित्र आणि नातेवाईकांनीही अनेकदा त्याला खडे बोल सुनावले आहेत. त्यावर महिला सेलच्या इन्चार्जने त्याला समजावून सांगितले आणि पत्नीला बोलावले.
पोलिसांनी महिलेला विडी पिण्याचे कारण विचारले असता तिने सांगितले की, जेव्हा ती एखाद्या गोष्टीवर नाराज असते तेव्हा ती विडी ओढते. त्यावर महिला सेल प्रभारीने तिला सांगितले की, तुझं शारीरिक नुकसान होण्यासोबतच पतीलाही तुझ्या विडी पिण्याने त्रास होत आहे. त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात आले आहे. अखेरीस ती तयार झाली आणि दोघांमध्ये समेट घडल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले.
अखेर दोघांमध्ये समेट
जहांगीराबाद येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याची पत्नी विडी पित असल्याची तक्रार केली होती. पत्नीला फोन करुन चौकशी केली असता तिने सांगितले की, जेव्हा ती अस्वस्थ असते, तेव्हा ती विडी ओढते. मात्र, आता दोघांची समजूत घालून त्यांना घरी एकत्र पाठवण्यात आले आहे. भविष्यात विडीचे सेवन न करण्याचे आश्वासनही महिलेने दिले आहे, अशी माहिती महिला सेलच्या इन्स्पेक्टर अरुणा राय यांनी दिली.