ऐन दिवाळीत ST कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा! 6 नोव्हेंबरपासून आंदोलनाची घोषणा; मुख्यमंत्र्यांकडे कोणत्या मागण्या?

पुणे:- दीवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी चिंतेची बातमी समोर येत आहे. यंदाच्या दिवाळीत लालपरी अर्थात एसटी बसचे चाक काही काळासाठी ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी येत्या 6 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे.
एसटी कामगारांनी आपल्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना पाठवले आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत वेतन अदा करणे, कर्मचाऱ्यांना 60 टक्के महागाई भत्ता मंजूर करणे आणि दिवाळी सणासाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा बोनस देणे यांचा समावेश आहे. जोपर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका कामगार संघटनांनी घेतली आहे.
लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते आणि सर्वसामान्य नागरिक सुरक्षित प्रवासासाठी एसटीलाच प्राधान्य देतात. मात्र ऐन सणासुदीच्या काळात कर्मचारी संपावर गेल्यास प्रवाशांचे मोठे हाल होण्याची दाट शक्यता आहे. या संपामुळे राज्यभरातली एसटी वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांना प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था शोधावी लागण्याची भीती वर्तवली जात आहे.
आता यावर राज्य सरकार आणि एसटी प्रशासन काय भूमिका घेते आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. ऐन दिवाळीत प्रवाशांची होणारी गैरसोय टळावी, यासाठी शासन काय पावले उचलणार, हे लवकरच स्पष्ट होईल.



