Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

समुद्रावर तरंगू लागले महागडे आयफोन्स आणि परफ्यूम्स! होर्मुजच्या सामुद्रधुनीत UAE चे व्यापारी जहाज बुडाले

जागतिक तेल पुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुजच्या सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या मालकीचे एक मोठे व्यापारी मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

‘जीएफएस प्राइड’ नावाचे हे कंटेनर जहाज समुद्री सुरुंग किंवा क्षेपणास्त्राच्या धडकेनंतर समुद्रात बुडाले. विशेष म्हणजे, हे जहाज बुडाल्यानंतर त्यातील हजारो कंटेनर्स फुटून समुद्राच्या लाटांवर महागडे आयफोन्स, लॅपटॉप्स आणि महागड्या ब्रँडेड परफ्यूम्सच्या बाटल्या तरंगताना दिसल्या. घटनास्थळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, स्थानिक मच्छीमार व नागरिक लहान बोटींच्या सहाय्याने हे तरंगणारे महागडे साहित्य गोळा करताना दिसत आहेत.

२,५०० कंटेनर्ससह जहाज जलसमाधी; २१ कर्मचाऱ्यांना वाचवले सिंगापूरच्या ध्वजाखाली धावणारे ‘जीएफएस प्राइड’ हे जहाज दुबईहून निघाले होते. या जहाजावर विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, आयफोन्स आणि महागड्या परफ्यूम्सने भरलेले सुमारे २,५०० हून अधिक कंटेनर्स होते. जहाजावर स्फोट होऊन आग लागल्यानंतर सागरी सुरक्षा पथकांनी तात्काळ मदतकार्य राबवून जहाजावरील सर्व २१ क्रू मेंबर्सना सुरक्षित बाहेर काढले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हल्ल्याबाबत परस्परविरोधी दावे: समुद्री सुरुंग की अज्ञात क्षेपणास्त्र?इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने दावा केला आहे की हे जहाज समुद्रात पेरलेल्या सुरुंगाच्या संपर्कात आल्यामुळे स्फोट झाला आणि ते बुडाले. आंतरराष्ट्रीय सागरी तपास अधिकाऱ्यांच्या मते, जहाजावर अज्ञात दिशेने आलेल्या प्रोजेक्टाइल किंवा ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता, ज्यामुळे जहाजाला आग लागली आणि ते समुद्रात बुडाले.

होर्मुजच्या सामुद्रधुनीत वाढता तणाव; ऊर्जा बाजारावर सावट जगातील सुमारे २० टक्के (एक पंचमांश) कच्चे तेल आणि एलएनजी वायू याच अरुंद सागरी मार्गावरून वाहून नेला जातो. त्यामुळे या भागात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक जहाजांवर हल्ले वाढले आहेत. यापूर्वी २३ सप्टेंबर रोजी ‘केप दाओ’ हे मालवाहू जहाजही अशाच हल्ल्यात बुडाले होते, ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. यूके मेरिटाईम ट्रेड ऑपरेशन एजन्सीनुसार, गेल्या ४८ तासांत या भागात किमान ५ संशयास्पद ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या घटनांची नोंद झाली आहे.

इराण-अमेरिका संघर्ष अमेरिकेने इराणवर लादलेल्या कठोर निर्बंधांच्या आणि सागरी नाकेबंदीच्या प्रत्युत्तरात इराण होर्मुज मार्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कच्च्या तेलाचे दर चढे ठेवण्यासाठी आणि जागतिक दबाव निर्माण करण्यासाठी इराण व्यापारी जहाजांना लक्ष्य करत असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *