
दुष्काळामुळे रोजगाराची टंचाई, हाताला काम मिळवण्यासाठी मजुरांची भटकंती आणि उत्पन्नात घट, अशा संकटांचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांना आता महागाईचा आणखी एक फटका बसत आहे.
आधी खाद्यतेल आणि साखरेच्या दरवाढीने घरखर्चाचे गणित बिघडले असताना, आता तांदळाच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. कुरुंदा परिसरात तांदळाचे दर किलोमागे २५ रुपयांनी वाढल्याने रोजच्या जेवणातील भातही महागला आहे. उत्पन्नाचे स्रोत मर्यादित आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने कुटुंबांना महिन्याचा खर्च भागवताना कसरत करावी लागत आहे.
तांदळाच्या दरात किलोमागे २५ रुपयांची वाढ
कुरुंदा परिसरातील बाजारपेठेत तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ५० रुपये प्रतिकिलो दराने मिळणारा साधा तांदूळ आता ७५ रुपयांवर पोहोचला आहे. तर आरएल तांदळाचा दर ७० रुपयांवरून ९५ रुपये प्रतिकिलो झाला आहे. म्हणजेच दोन्ही प्रकारच्या तांदळाच्या दरात किलोमागे २५ रुपयांची वाढ झाली आहे.
तांदूळ हा अनेक कुटुंबांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याच्या दरातील वाढीचा परिणाम थेट घरखर्चावर होत आहे. कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि महिन्याला लागणारे धान्य यानुसार अतिरिक्त खर्चाचा भार वाढत आहे. आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांसाठी ही दरवाढ त्रासदायक ठरत आहे.



