बॉर्डरवरून सुरू होती हाय-टेक तस्करी,सिनेमास्टाईल पाठलाग अन् कारमध्ये सापडला गुप्त कप्पा, उघडताच अधिकारी चक्रावले; 5 किलो वजनाचे घबाड…

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात DRI ने एका कारमधून सुमारे 8.98 कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. या सोन्याचे वजन 5.83 किलोग्रॅम आहे.
या प्रकरणात कारमधून प्रवास करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार कारच्या पुढील प्रवासी सीटखाली तयार करण्यात आलेल्या गुप्त कप्प्यात हे सोने लपवण्यात आले होते. भारत-बांगलादेश सीमेवरून या सोन्याची तस्करी करून ते भारतात आणल्याचा संशय आहे. त्यानंतर हे सोने कोलकात्याहून हैदराबादला नेले जात होते.
ही घटना 8 आणि 9 ऑक्टोबरच्या मध्यरात्री घडली. एका कारमधून परदेशी सोने नेले जात असल्याची माहिती DRI च्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील देखरेख वाढवली. त्यानंतर त्यांना एक संशयास्पद कार दिसली. अधिकाऱ्यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र कार पकडण्यासाठी पथकाला बराच वेळ तिचा पाठलाग करावा लागला. अखेर कार थांबवण्यात अधिकाऱ्यांना यश आले. त्यानंतर कारची तपासणी सुरू करण्यात आली आणि या प्रकरणाला नवे वळण मिळाले.
कारची झडती घेत असताना अधिकाऱ्यांना पुढील प्रवासी सीटखाली एक असा भाग आढळला, जो विशेषतः वस्तू लपवण्यासाठी तयार करण्यात आला होता. सीटखाली पाय ठेवण्यासाठी असलेल्या जागेत एक खास पोकळी म्हणजेच गुप्त कप्पा तयार करण्यात आला होता. या कप्प्यातून सोन्याची तीन पाकिटे जप्त करण्यात आली. या पाकिटांमध्ये एकूण 5,832.90 ग्रॅम सोने ठेवण्यात आले होते.
DRI च्या माहितीनुसार हे सोने 24 कॅरेटचे असून त्याची शुद्धता 999 फिनेस होती. म्हणजेच सुमारे 5.83 किलोग्रॅम सोन्याची अंदाजे किंमत 8.98 कोटी रुपये आहे. हे सोने अशा प्रकारे लपवण्यामागे नेमका काय उद्देश होता? यापूर्वीही तस्करीसाठी अशाच पद्धतीचा वापर करण्यात आला होता का? तसेच या प्रकरणामागे तस्करीचे एखादे मोठे जाळे कार्यरत आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
DRI च्या माहितीनुसार प्राथमिक तपासात हे सोने भारत-बांगलादेश सीमेवरून तस्करी करून देशात आणल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर हे सोने कोलकात्याहून हैदराबादला नेले जात होते. सध्या हे सोने नेमके कुठून आणण्यात आले, ते कोणी पाठवले होते आणि हैदराबादमध्ये त्याची डिलिव्हरी कोणाला दिली जाणार होती, याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघांची भूमिका काय होती आणि या कथित तस्करीमध्ये आणखी काही लोक सहभागी आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
DRI ने जप्त केलेले सोने ताब्यात घेतले असून कारमध्ये असलेल्या दोघांनाही अटक केली आहे. त्यानंतर त्यांना संबंधित अधिकारक्षेत्रातील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तेथून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सध्या DRI या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.



