Navgan News



Add Space

ताज्या बातम्याराजकीय

विधानपरिषदेसाठी शिवसेनेची सरनाईकांना उमेदवारी, देशपांडेंचं बंड; भाजपचेही दोन नेते मैदानात, महायुतीतच टशन

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा केवळ एका विधानपरिषद जागेची निवडणूक राहिलेली नाही. शिक्षक संघटनांच्या प्रभावातून राजकीय पक्षांच्या सक्रिय सहभागाकडे या मतदारसंघाचा प्रवास झाल्याचे चित्र यावेळी अधिक स्पष्ट झाले आहे.

विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे हे दोघेही शिवसेनेत दाखल झाल्याने निर्माण झालेला अंतर्गत पेच, भाजपमधील संगीता शिंदे, शेखर भोयर यांचे बंड, काँग्रेसने प्रा. अदिती पोहरे यांना दिलेली उमेदवारी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रा. दत्तात्रय लहाने यांना मैदानात उतरविल्याने निवडणुकीचे स्वरूप बहुकोनी होण्याची चिन्हे आहेत. अशा स्थितीत पक्षीय ताकदीपेक्षा शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आणि संघटनात्मक बांधणी महत्त्वाची ठरणार आहे.

अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश अमरावती शिक्षक मतदारसंघातून २०२०च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून किरण सरनाईक यांनी प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. सहा वर्षांनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. दोन्ही नेते आता शिवसेनेत असल्याने पक्षासमोर उमेदवारीचा पेच निर्माण झाला होता.

सरनाईक हे विद्यमान आमदार असल्याने त्यांचा दावा होता, तर देशपांडे यांनी दीर्घकाळ पक्षाशी असलेला संबंध आणि शिक्षक मतदारसंघातील पूर्वीचा अनुभव पुढे केला होता. देशपांडे यांनी पक्षाकडून आणि अपक्ष अशा दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण अखेर सरनाईक यांनाच एबी फॉर्म देण्यात आला असून ते अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात असणार आहेत. तर पक्षाने उमेदवारी न दिल्यासही निवडणूक लढविण्याची भूमिका देशपांडे यांनी जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *