Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

पांढऱ्या सोन्याला संकटाची काळी छाया! गतवर्षी भावाने दिला दिलासा; यंदा विक्रमी पेरणी करूनही चिंता

कापूस शेतकऱ्यांसाठीकेवळ एक पीक नाही, तर वर्षभराच्या कष्टांची आणि आशेची पांढरी पावती आहे. गतवर्षी कापसाला मिळालेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कापसाची विक्रमी पेरणी केली.

मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने या ‘पांढऱ्या सोन्या’ वर संकटाची काळी छाया पडली आहे. ७ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक कापूस दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र उत्साहाऐवजी चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत आहेत. पांढरे सोने, पण काळजीचे ढग : कापूस पाचही खंडांतील ७५ हून अधिक देशांत घेतला जाणारा आणि जगभर व्यापार होणारा महत्त्वाचा नगदी पीक आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देण्यासोबतच लाखो कुटुंबांच्या रोजगाराचे साधन कापूस आहे.

भाव मिळाला, आता उत्पादनाची चिंता:

मागील हंगामातील चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यामुळे यंदा कापसाच्या क्षेत्रात वाढ झाली. मात्र कापसासाठी आवश्यक असलेल्या पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे.शेतकऱ्यांपासून जिनिंग-प्रेसिंग उद्योग, वाहतूक आणि वस्त्रोद्योगापर्यंत मोठी रोजगारसाखळी या पिकाशी जोडलेली आहे. मात्र जिल्ह्यात यंदा परिस्थिती वेगळी आहे. गतवर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा कापसाकडे कल वाढला. परिणामी यंदा जिल्ह्यात कापसाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. सुरुवातीला पिकाची स्थिती समाधानकारक दिसत होती; मात्र पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने पिकाच्या वाढीवर आणि अपेक्षित उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कापूस दिनाचा इतिहास

बेनिन, बुर्किना फासो, चाड आणि माली या ‘कॉटन-४’ देशांच्या पुढाकाराने जागतिक कापूस दिनाची संकल्पना पुढे आली. ७ऑक्टोबर २०१९ रोजी जागतिक व्यापार संघटनेने पहिल्यांदा जागतिक कापूस दिन साजरा केला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने २०२१ मध्ये ७ ऑक्टोबर हा दिवस अधिकृतपणे जागतिक कापूस दिन म्हणून घोषित केला.

कापूस उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, उत्पादन टिकाऊ व्हावे आणि विकसनशील देशांतील कापूस उत्पादकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. पण या उद्दिष्टांची खरी पूर्तता तेव्हाच होईल, जेव्हा कापूस उत्पादकाला हमीचा बाजार, योग्य दर, उत्पादन खर्चाला साजेसा मोबदला आणि नैसर्गिक संकटात प्रभावी मदत मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *