मोठे चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार, आता ७० किमीवर…; या राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र वेगाने किनारपट्टीच्या दिशेने सरकत असून, गेल्या ६ तासांत १२ किमी प्रतितास वेगाने ते पश्चिमेकडे सरकले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, बुधवार, २३ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत हे डीप डिप्रेशन उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीदरम्यान असलेल्या कलिंगपट्टनमजवळून किनारपट्टी ओलांडण्याची दाट शक्यता आहे.
या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर वाढणार असून, काही भागांत मात्र उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे.
बिहार आणि मध्य प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने आज संपूर्ण बिहारमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील सर्व ३८ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर विभागांतर्गत येणाऱ्या छिंदवाडा, सिवनी आणि बालाघाट या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी ३४.२ इंच पाऊस झाला असून, सरासरीच्या ९१.५ टक्के इतकीच नोंद आहे. आगामी ४ दिवस अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये सप्टेंबर महिन्यात मे महिन्यासारखा उकाडा; पारा ४१ अंशांवर! दुसरीकडे, राजस्थानमधून पावसाने पूर्णपणे काढता पाय घेतल्याने नागरिकांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यातही मे महिन्यासारखी कडक उन्हाची जाणीव होत आहे. जैसलमेरमध्ये कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, तर बिकानेर आणि बाडमेरमध्ये पारा ४० अंशांच्या पुढे नोंदवला गेला. जयपूर, जोधपूर, अजमेर आणि पिलानी या शहरांमध्येही तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. पुढील ४ ते ५ दिवस हवामान पूर्णपणे कोरडे राहून उकाडा कायम राहील, असा अंदाज आहे.
हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये काय स्थिती? पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे २६ सप्टेंबरपासून हरियाणात ढगाळ वातावरण निर्माण होईल. त्यानंतर २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंडच्या ७ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज : उत्तराखंडमधील उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चमोली, चंपावत, नैनिताल, बागेश्वर आणि पिथौरागढ या सात जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून उर्वरित जिल्ह्यांत हवामान कोरडे राहील.



