Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

६०० सीट्स रिकाम्या, ‘ही’ वंदे भारत ट्रेन मथुरापर्यंत चालवायची योजना; प्रवाशांना नवा पर्याय!

भारतीय रेल्वेची वंदे भारत ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. देशातील अनेक भागांना वंदे भारत ट्रेन जोडत असून, अनेक मार्गांवर १०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने धावते.

परंतु, असे काही मार्ग आहेत, जिथे प्रवाशांचा प्रतिसाद कमी आहे. अशा मार्गांचा विस्तार करण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. एका वंदे भारत ट्रेनच्या सुमारे ६०० सीट्स रिकाम्या जात आहेत, या पार्श्वभूमीवर या ट्रेनचा विस्तार मथुरापर्यंत करण्याचा विचार केला जात आहे.

धर्म, श्रद्धा आणि संस्कृतीची तीन प्रमुख केंद्रे आता हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कने जोडली जाणार आहेत. वाराणसी आणि आग्रा दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस मथुरेपर्यंत विस्तारित केली जाऊ शकते. रेल्वे यावर काम करत असून, विधानसभा निवडणुकांपूर्वी याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. ट्रेनमधील मोठ्या संख्येने जागा रिक्त राहत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार २२ ते २८ सप्टेंबर दरम्यान आग्रा आणि प्रयागराज दरम्यान दररोज ६०० हून अधिक जागा रिक्त राहिल्या. ट्रेनची सेवा आणि प्रवासी संख्या वाढवण्यासाठी मार्गाचा विस्तार करण्यावर भर दिला जात आहे.

वाराणसी ते मथुरा प्रवासाला आठ तासांपेक्षा कमी वेळ लागेल

ट्रेन क्रमांक २०१७६ आग्रा कॅन्ट ते वाराणसी दरम्यान प्रयागराजमार्गे धावते. हे अंतर कापायला अंदाजे ७ तास लागतात. मथुरापर्यंत विस्तार झाल्यानंतर वाराणसी ते मथुरा प्रवासाला ८ तासांपेक्षा कमी वेळ लागण्याची अपेक्षा आहे. यामुळे काशी, संगम शहर प्रयागराज आणि मथुरा यांच्यातील थेट रेल्वे संपर्क अधिक मजबूत होईल. मथुरा जंक्शनवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यासाठी पिट लाइन म्हणजेच देखभाल सुविधा आवश्यक असेल. एनसीआरच्या आग्रा विभागाने मथुरा येथे नवीन पिट लाइन बांधण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याचा अंदाजित खर्च सुमारे १८ कोटी रुपये आहे.

दरम्यान, मथुरा येथील भाजप खासदार हेमा मालिनी यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून ‘वंदे भारत’ योजना मथुरापर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्यापर्यंतही पोहोचले आहे. आता, विस्ताराची घोषणा ही पिट लाइनच्या तयारीवर आणि रेल्वेच्या पुढील प्रक्रियेवर अवलंबून असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *