
पाकिस्तानी हवाई दलाने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतावर केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये अमेरिकन बनावटीच्या ‘GBU-12 पेव्हेवे २’ या लेझर-गाइडेड बॉम्बचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अफगाणिस्तानातील सूत्रांनी जारी केलेल्या अवशेषांच्या फोटोंवरून हा खळबळजनक दावा समोर आला असून, या हल्ल्यात नागरिक जखमी आणि ठार झाल्याचे वृत्त आहे.
बॉम्बच्या अवशेषांवर अमेरिकन कंपनीचे कोड आणि खुणा
हवाई हल्ल्यानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये बॉम्बच्या तुकड्यांवर ‘FOR USE ON MK82 FIN GUIDED BOMB’ आणि ‘96214’ हा कोड स्पष्टपणे दिसत आहे. संरक्षण क्षेत्रातील तांत्रिक नोंदीनुसार, हे कोड ‘पेव्हेवे’ गाइडन्स प्रणालीशी आणि अमेरिकेच्या प्रसिद्ध ‘रेथियॉन’ कंपनीशी संबंधित आहेत.
काय आहे GBU-12 पेव्हेवे २ बॉम्बची वैशिष्ट्ये?
GBU-12 हा सर्वसाधारण वापराच्या MK-82 बॉम्बवर आधारित एक प्रगत लेझर-गाइडेड बॉम्ब आहे. याचे एकूण वजन सुमारे २२७ किलोग्रॅम (सुमारे ५०० पाउंड) असून त्याची लांबी ३.३ मीटर आणि व्यास २७ सेंटीमीटर असतो. लक्ष्यावर लेझर पाडून हा बॉम्ब डागला जातो; लेझर बीमचा माग काढत हा बॉम्ब अचूक निशाणा साधतो. जगातील अनेक देशांच्या हवाई दलात याचा वापर केला जातो.
दाव्यांची सत्यता आणि तज्ज्ञांचे मत
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, केवळ काही अवशेषांवरून बॉम्बचा मूळ स्रोत किंवा तो पाकिस्तानपर्यंत कसा पोहोचला, याची खात्रीशीर पुष्टी करता येत नाही. यासाठी स्वतंत्र चौकशीची गरज आहे. पाकिस्तानने या कारवाईत दहशतवादी तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला असला, तरी अफगाण प्रशासनाने निवासी भागांवर हल्ला करून नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. भूतकाळात अमेरिकेने दहशतवादविरोधी मोहिमांसाठी पाकिस्तानला अशी शस्त्रास्त्रे पुरवली होती. या नव्या आरोपांमुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



