सिन्नर दूध भेसळ प्रकरण: तुकाराम मुंडेंनाच थेट आव्हान; ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांनी केली भेसळखोरांशीच हातमिळवणी!

राज्यभर अन्न व औषध प्रशासन विभागाची धडाकेबाज कारवाई चर्चेत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या विभागाची वेगळी प्रतिमा आणि धाक निर्माण झाला आहे. नाशिकच्या दोन अधिकाऱ्यांनी मात्र या प्रतिमेला धक्का दिला आहे.
दोन महिन्यांपूर्वी पुतळेवाडी (सिन्नर) येथे अन्न व औषध प्रशासनाकडे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी तक्रार केली होती. बैरागी दूध भेसळ विरोधात गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. त्यांनी याबाबत पुराव्यासह तक्रार केली होती.
थेट राज्याच्या आयुक्तांकडे तक्रार केल्याने तपासाची चक्रे फिरली. स्थानिक पथकाने पुतळेवाडी आणि परिसरातील दोन गावांमध्ये छापेमारी केली. यावेळी दिवसभर केलेल्या तपासणीत 17 लाख रुपयांचे दूध भेसळीचे साहित्य व संशयित भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणावर सापडले.
यासंदर्भात सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईच्या वेळी पथकासमवेत भेसळ करणारा मुख्य आरोपीच अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत असल्याचे पाहायला मिळाले. तक्रार दाखल झाल्यावर कारवाईसाठी या अधिकाऱ्यांनी पोलिसांना कोणतीही मदत केली नाही.
परिणामी दूध भेसळ येथील आरोपी अद्यापही मोकाट आहे. त्याला अटक झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर यापूर्वी भेसळीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला दूध भेसळीमुळे अटक देखील करण्यात आली होती.
या प्रकरणात संशयास्पद कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्याने त्याची चौकशी झाली. या चौकशीत सहाय्यक आयुक्त दिनेश तांबोळी आणि अन्य सुरक्षा अधिकारी संदीप तोरणे यांच्या विरोधात संशयीताला मदत करणे आणि भेसळीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा अहवाल राज्याच्या आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.या प्रकरणात नाशिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला तडा जाईल अशी कामगिरी केली आहे. विभागाची प्रतिमा मलिन करण्याचे काम या अधिकाऱ्यांनी करीत भेसळखोरांना संरक्षण दिल्याचे चित्र आहे. आता याबाबत आता याबाबत संबंधितांवर वरिष्ठ काय कारवाई करतात याची उत्सुकता.



