ओटीपी’ शेअर केला अन् 80 हजार 855 रुपये गेले; बँकेविरोधातील ग्राहकाची तक्रार आयोगाने फेटाळली

बँकिंग तपशील आणि वन टाइम पासवर्ड (ओटीपी) यांसारखी गोपनीय माहिती स्वतः शेअर केल्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्यास त्यासाठी बँकेला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल दक्षिण गोवा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला.
आयोगाने कोटक महिंद्रा बँक आणि पेटीएमविरोधात दाखल केलेली ग्राहकाची तक्रार फेटाळून लावली.
अँथनी फर्नांडिस यांचे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ कोटक महिंद्रा बँकेत बचत खाते आहे. १४ जून २०२२ रोजी त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ८० हजार ८५५ रुपयांचा संशयास्पद व्यवहार होऊन ही रक्कम पेटीएम, नोएडा येथे वर्ग झाल्याचा दावा त्यांनी केला होता. या व्यवहाराबाबत त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधून कार्ड तसेच बँकिंग सेवा बंद करण्याची विनंती केली होती. तसेच वेर्णा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
बेला नाईक आणि सदस्य नेली परेरा डिसिल्वा यांनी सादर पुरावे व युक्तिवाद विचारात घेत तक्रारदाराला व्यवहार अनधिकृत असल्याचे सिद्ध करता आले नसल्याचे नमूद केले. गोपनीय माहितीशिवाय व्यवहार होणे शक्य नसल्याने बँकेच्या सेवेत त्रुटी असल्याचा दावा आयोगाने फेटाळला.



